ग्रामविकास विभागाने घेतली दखल
। खरोशी । वार्ताहर ।
जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या ऑनलाईन आंतरजिल्हा बदलीची सुरुवात सन 2017 सालापासून झाली आहे. तेव्हापासून आतापर्यंत आंतरजिल्हा बदलीचे एकूण सहा टप्पे पूर्ण झाले आहेत. शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदली प्रक्रियेमधील होणारा भ्रष्टाचार व वर्षानुवर्षी लालफितीत अडकणारी प्रक्रिया ऑनलाइन बदली धोरणामुळे थांबली आहे.
दरवर्षी एप्रिल-मे महिन्यामध्ये बदली इच्छुक शिक्षकांना आपल्या स्वजिल्ह्यात बदलीने जाण्याचे वेध लागतात. वर्षानुवर्षे इतर जिल्ह्यातील सेवा केल्यानंतर स्वजिल्ह्यात बदली हा जिव्हाळ्याचा प्रश्न असतो. परंतु, आंतरजिल्हा बदलीच्या सातव्या टप्प्यात मध्यंतरीची लोकसभा व विधानसभा निवडणूक व त्या अनुषंगाने आलेली आचारसंहिता यामुळे खंड पडला होता. त्यामुळे आंतरजिल्हा बदली इच्छुक शिक्षकांमध्ये थोडीशी धाकधूक होती. परंतु, राष्ट्रीय ओबीसी बहुजन शिक्षक महासंघाने याबाबत ग्रामविकास विभागाच्या मंत्र्यांची भेट घेऊन त्यांचे ओएसडी नारायण गोरे यांना याबाबतची निवड लक्षात आणून दिली. त्याची दखल घेऊन सर्व जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकार्यांना 10 मार्च ते 6 एप्रिलपर्यंत आंतरजिल्हा बदलीच्या करावयाच्या कार्यवाहीचे वेळापत्रक शासनाकडून देण्यात आले आहेत.
सर्व बदली इच्छुक शिक्षकांच्या बदल्या होण्यासाठी जिल्हावार रिक्त पदांची माहिती प्रत्येक जिल्हा परिषदेने अचूक कळविणे आवश्यक आहे. त्याचबरोबर जिल्हानिहाय रोष्टर अपूर्ण असल्याने काही जिल्ह्यातील बदली प्रक्रिया पूर्ण होत नाही, त्यासाठी राज्य रोष्टर हा एकमेव पर्याय संघटनेसमोर आहे. भविष्यात त्यासाठी मोठा लढा उभारावा लागणार आहे. त्याचबरोबर काही जिल्हा परिषद बदली होऊनही त्या शिक्षकांना कार्यमुक्त करत नाहीत, त्याबाबत ही ठोस धोरण शासनाने अवलंबविण्याची गरज आहे.
– अनिल नाचपले, प्रदेशाध्यक्ष,
राष्ट्रीय ओबीसी बहुजन शिक्षक महासंघ