कुणबी नोंदीवरुन भुजबळांचा सरकारला घरचा आहेर

सरसकट मराठा आरक्षणाला केला विरोध

| छ. संभाजीनगर | वृत्तसंस्था |

आमचा मराठा आरक्षणाला कधीच विरोध नाही. पण, तो इतरांच्या आरक्षणाला धक्का न लावता देण्यात यावा. जी शरद पवारांची भूमिका आहे, तीच आमची भूमिका आहे. कुणबी नोंदी अचानकपणे कशा काय वाढल्या असा संताप समता परिषदेचे अध्यक्ष तथा मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त करत राज्य सरकारला घरचा आहेर दिला. बीडच्या जाळपोळीच्या घटनेनंतर छगन भुजबळ हे बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. त्यांनी सर्व जाळपोळीची पाहाणी करुन छत्रपती संभाजी नगर येथे पत्रकार परिषद घेतली.

मंत्री, न्यायमूर्ती जात आहेत आणि मनोज जरांगे पाटील यांच्यासमोर हात जोडत आहेत. मंत्री सत्तेसाठी जात आहेत, पण न्यायमूर्ती देखील जाऊन सर सर करत आहेत. मग ओबीसींना काय न्याय मिळेल, ते तिकडे जाऊन हात जोडत आहेत. कुणबी तपासणीसाठी 5 हजार नोंदी मिळाल्यानंतर अचानक 10 हजार झाल्या. त्यानंतर 13 हजार झाल्या आणि आता तर साऱ्या महाराष्ट्रात कार्यालय उघडले, असे ते म्हणाले. मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देऊ नका. त्यांना वेगळं आरक्षण द्या. ओबीसींमध्ये आधीच खूप जाती आहेत. त्यामुळे अधिक वाटेकरी करु नका. जरांगे पाटलांच्या सभेसाठी नुकसान झाल्याने त्यांना नुकसान भरपाई देण्यात आली. मग, ज्यांची घरे जाळण्यात आली त्यांनाही शासनाने मदत करावी. जाळपोळ करणारे तुमची माणसं नाही म्हणता मग कारवाई मागे घेण्याची मागणी कशाला करतात, असेही भुजबळांनी सुनावले.

मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊ नये. त्यामुळे ओबीसी समाजाचे मोठे नुकसान होईल. ओबीसी आरक्षण संपवण्याचा घाट घातला जातोय. आंदोलनावेळी ओबीसी नेत्यांना टार्गेट करण्यात आलं. घरांवर हल्ले झाले. यावेळी पोलिस इतके हतबल कसे झाले. त्यांनी कुठेही प्रतिकार केला नाही. बीडमधील हिंसाचार पूर्वनियोजित कट होतो. किती पोलिस जखमी झालेत याची चौकशी व्हायला पाहिजे, अशी मागणी भुजबळांनी केली. अंतरवाली इथं जरांगे ज्यावेळी उपोषणाला बसले होते, त्यावेळी पोलिस जखमी झाले, पोलिसांची बाजू पुढे आली नाही. त्यांच्यावर हल्ला झाला होता. त्यावर सरकारणे काही अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. कारवाई केली. गुन्हे मागे घ्याययला लावले. तपास यंत्रणा पूर्णपणे फेल झाली आहे, असंही ते म्हणाले.

बीड आणि माजलगाव येथे घरे, ऑफिस, हॉटेल्स जाळपोळ केली त्याची पाहणी करण्यासाठी गेलो होतो. समता परिषदेचे हॉटेल्सचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तासभर 400-500 जणांचा जमाव नासधूस करत होता. त्यात पहारी, कुऱ्हाडी घेऊन आले होते. अक्षरशः त्या हॉटेल्सची राखरांगोळी करण्यात आली. एक दोन पोलिस होते ते काहीही करू शकले नाहीत. असं भुजबळ म्हणाले. क्षीरसागर यांचे घर का जाळले? त्यांनी तर काहीही म्हटलं नाही. ते तेली समाजाचे आहेत म्हणून त्यांचे घर जाळलं का? या सगळ्या जाळपोळीची कठोर चौकशी करायला हवी, अशी मागणी त्यांनी केली.

Exit mobile version