घुसखोरी प्रकरणावरून विरोधकांचा गोंधळ
| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
लोकसभेतील घुसखोरी प्रकरणावरून सोमवारीही विरोधकांनी संसदेच्या दोन्ही सभागृहात गोंधळ घातला. त्यानंतर लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी 31 खासदारांना अधिवेशनाचे कामकाज संपेपर्यंत निलंबित केले आहे. त्यामुळे आघाडीला मोठा धक्का बसल्याचे बोलले जाते. काही दिवसांपूर्वी लोकसभेतील 13 आणि राज्यसभेतील एका खासदाराचे निलंबन करण्यात आले आहे.
निलंबित करण्यात आलेल्या खासदारांमध्ये काँग्रेसचे अधीर रंजन चौधरी, डीएमकेचे टी.आर.बालू, दयानिधी मारन, तृणमूलच्या सौगत रॉय यांचाही समावेश आहे. सोमवारी दोन्ही सभागृहाचे कामकाज सुरू झाल्यानंतर विरोधकांनी गोंधळ घालण्यास सुरूवात केली. त्यामुळे सरूवातीला दुपारी बारा वाजेपर्यंत कामकाज तहकूब करावे लागले. दुपारी बारा वाजता कामकाज सुरू झाल्यानंतर पुन्हा विरोधकांकडून घोषणाबाजी सुरू झाली. त्यामुळे दुसऱ्यांदा कामकाज तहकूब करण्याची वेळ आली. ओम बिर्ला यांनी विरोधकांना या प्रकरणाचे राजकारण न करण्याचे आवाहन करत शांत राहण्यास सांगितले. पण विरोधी बाकांवरील सदस्य आक्रमक असल्याने दुपारी दोन नंतर दिवसभरासाठी कामकाज तहकूब करण्यात आले.
विरोधी बाकांवरील खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी सभागृहात येऊन भूमिका स्पष्ट करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर लोकसभा अध्यक्षांनी 31 खासदारांना अधिवेशनाचे कामकाज संपेपर्यंत निलंबित केले, तर तिघांच्या निलंबनाचा प्रस्ताव समितीकडे पाठविण्यात आला आहे. ही समिती याबाबतचा निर्णय घेणार आहे.
दरम्यान, लोकसभेत 13 डिसेंबरला दोन तरुणांनी घुसखोरी केली होती. तर संसदेबाहेर दोघांनी घोषणाबाजी करत स्मोक स्टीक जाळल्या होत्या. याप्रकरणी आतापर्यंत सहा जणांना अटक करण्यात आली आहे. हिवाळी अधिवेशनाचे कामकाज सुरू असतानाच ही घुसखोरी झाल्याने सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. विरोधकांकडून त्यावरून सरकारला धारेवर धरले जात आहे. गोंधळामुळे 14 डिसेंबरला लोकसभेचे 13 आणि राज्यसभेच्या एका खासदारांना निलंबित करण्यात आले होते. आता एकाच दिवशी 31 सदस्यांना निलंबित करण्यात आल्याने विरोधकांना मोठा धक्का बसला आहे.