ऐन आचारसंहिता काळातदेखील पोलिसांच्या डोळ्यादेखत जुगार होता सुरूच
| पनवेल | प्रतिनिधी |
पनवेल शहरातील खांदा कॉलनी येथील सेक्टर 10 मध्ये एका इमारततीच्या दुकान गळ्यामध्ये बिंगो जुगार अड्डा जोमाने सुरूच आहे. ऐन विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू असतानाही खांदेश्वर पोलिसांच्या डोळ्यादेखत हा बेकायदेशीर जुगार सुरूच होता. हा जुगार अड्डा बंद करण्याबाबत खांदेश्वर पोलिसात तक्रार अर्ज सादर करूनदेखील हा जुगाराचा धंदा पोलिसांच्या आशीर्वादाने मोकाटपणे सुरूच होता, असे येथील रहिवाशांचे म्हणणे आहे.
याबाबत नवी मुंबई पोलीस आयुक्तालय परिमंडळ-2 चे सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक राजपूत यांच्यादेखील कानावर सदर बाब टाकण्यात आली असून, या जुगार अड्ड्यावर कारवाई करण्याचे आश्वासन पोलिसांमार्फत देण्यात आले. मात्र, सहाय्यक पोलीस आयुक्तांच्या आदेशाला झुगारून खांदेश्वर पोलीस अशा जुगार धंद्यांना पाठबळ देताना दिसत आहेत, अशी चर्चा आहे. याठिकाणी खालील खान हे सदरचा धंदा चालवीत असून, त्यांचे परिमंडळ-2 मध्ये इतरही ठिकाणी कामोठे, खांदा कॉलनी वैगेरे अशा प्रकारचे जुगार अड्डे सुरू आहेत. शहरामध्ये तरुणांना जुगाराकडे वळवून देशाचे भवितव्य असणार्या युवा पिढीला बरबाद करण्याचे काम या जुगार अड्ड्यांमुळे होत असल्याने याठिकाणी कारवाई होणे गरजेचे आहे, तसेच सदर अवैध धंदे हे कायमस्वरूपी बंद करण्यात यावे, अशी मागणी पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीने दिलेल्या तक्रार अर्जामध्ये करण्यात आली आहे.
सदरचा दुकान गाळा बाहेरून बंद करण्यात येत असला तरी आत ऑनलाईन बिंगो जुगार हा धंदा सुरू असतो. भिंतीवर जवळपास 7 ते 8 मशीन लावण्यात आल्या आहेत. त्यावर अनेकजण जुगार खेळत असतात. व्हिडिओ पार्लर चालविणार्या खालील खान यांच्यामार्फत दिवसाढवळ्या करोडो रुपयांचा व्यवहार केला जात आहे. त्यामुळे युवा पिढीला वाचविण्यासाठी नवी मुंबई पोलीस आयुक्तालय हद्दीतील बिंगो जुगार कायमचे बंद करण्यात यावेत, अशी मागणीदेखील यावेळी करण्यात आली आहे. पोलीस प्रशासन मात्र याबाबत कारवाई करण्यासाठी धजावत आहेत, असेच चित्र सध्या समोर आले आहे. त्यामुळे नवी मुंबई पोलीस आयुक्तालय हद्दीतील परिमंडळ-1 आणि परिमंडळ-2 मधील तरुणाई बिघडविणारे अवैध धंदे बंद करण्यासाठी वेळीच उपोषणाचे हत्यार उपसले जाण्याची तयारी पत्रकार सुरक्षा समितीच्या पदाधिकार्यांकडून करण्यात आली आहे.