भाजपने निष्ठावांना सोडले वार्‍यावर

स्थानिक आमदारांकडून रवीकांत म्हात्रेंचा पत्ता कट

| पेण | प्रतिनिधी |

पेण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचे बिगूल वाजले असून, भाजपविरुद्ध महाविकास आघाडी अशी थेट लढत आहे. मात्र, भाजपमध्ये दोन गट असून, नवी भाजप (मा. आमदार धैर्यशील पाटील), जुनी भाजप (आमदार रविशेठ पाटील) असे गट आहेत. यामध्ये ग्रामपंचायत सर्वसाधारण प्रतिनिधी गटामध्ये एक जागा नवीन भाजपला आणि एक जागा जुन्या भाजपला घेण्यात आली होती. मात्र, जुना भाजप म्हणजे आमदार रविशेठ पाटील यांच्याकडून रवीकांत दत्तात्रेय म्हात्रे याला पहिल्यांदा उमेदवारी जाहीर केली. रवीकांत हा आमदारांचा एकनिष्ठ कार्यकर्ता असून, वैकुंठ निवासासाठी कोणतीही जबाबदारी पार पाडायला तयार असतो. आज वैकुंठावर खुशीत गाजरे खात असले तरी पेण नगरपालिकेच्या नगराध्यक्षांना नगराध्यक्षा करण्यामागे रवीकांत म्हात्रे यांचा सिंहाचावाटा आहे. असे असताना देखील रवीकांत म्हात्रे यांना भाजपची अधिकृत उमेदवारी न देता पूजा अशोक पाटील यांना आमदार रविशेठ पाटील यांनी उमेदवारी देऊन रवीकांत म्हात्रे यांच्यासारख्या सच्च्या कार्यकर्त्याला वार्‍यावर सोडले आहे.

आज तालुक्यात एकही गाव असा नसेल की, जो रवीकांत म्हात्रे यांना ओळखत नाही. मात्र, रवीकांत म्हात्रे यांची आर्थिक स्थितीची सबब पुढे करुन रवीकांत म्हात्रे यांना डावलल्याची सर्वत्र चर्चा आहे. मात्र, असे असताना रवीकांत म्हात्रे यांनी ही निवडणूक लढवण्याची ठरविले असून, त्यांचा मित्रपरिवार आमदार रविशेठ पाटील यांचविरुद्ध शंढू ठोकून मैदानात उतरले आहेत. या आपापसातील वादामुळे कळत-नकळत आघाडीच्या उमेदवारांना आशाचे धुमारे फुटायला सुरुवात झाली आहे. एकंदरीत रवीकांत म्हात्रे यांचा दांडगा जनसंपर्क पाहता भाजपची ग्रामपंचायत विभागामध्ये डोकेदुखी वाढणार आहे.

Exit mobile version