| मुंबई | वृत्तसंस्था |
गत निवडणुकीत 28 पैकी तब्बल 25 जागा जिंकून कर्नाटकात काँग्रेसचा सफाया केलेल्या भाजपपुढे यावेळी मात्र संख्याबळ राखण्याचे आव्हान आहे. ‘अब की बार, चारसौ पार’ असा देशपातळीवर नारा देणार्या भाजपच्या जागा कर्नाटकात गतवेळच्या तुलनेत कमी होण्याची शक्यता सद्यःस्थितीत दिसते आहे. कर्नाटकात दुसर्या आणि तिसर्या टप्प्यात निवडणुका होत आहेत. 26 एप्रिलला 14 जागांसाठी, तर उर्वरित 14 जागांसाठी सात मे रोजी मतदान होईल. भाजप आणि धर्मनिरपेक्ष जनता दल (जेडीएस) यांची युती विरुद्ध काँग्रेस असा सरळ सामना होत आहे. त्यामुळे बहुतांश लढती लक्षवेधी ठरणार आहेत.
गेल्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांचे बंधू डी. के. सुरेश हे काँग्रेसचे एकमेव उमेदवार लोकसभेत गेले होते. भाजपने 25 जागा जिंकल्या होत्या. जेडीएसला एक जागा मिळाली होती, तर एक अपक्ष विजयी झाला होता. भाजपने यावेळी किमान 20 जागा जिंकण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे, तर काँग्रेसने दोन अंकी संख्या गाठण्याचा चंग बांधला आहे.
असं मानलं जातं, की 2014 मध्ये आलेल्या मोदी लाटेत काँग्रेसची देशभरात वाताहत झाली. कर्नाटकात मात्र त्याआधीपासूनच लोकसभेसाठी काँग्रेसची पीछेहाट सुरू झाली होती. 1999 मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेसने येथे सर्वाधिक 18 जागा जिंकल्या होत्या. त्यानंतर 2004 मध्ये झालेल्या निवडणुकीत काँग्रेसला फक्त आठ जागा मिळू शकल्या होत्या. त्यानंतर 2009 मध्ये सहा, तर 2014 मध्ये नऊ जागा मिळाल्या होत्या.
2019 मध्ये तर काँग्रेसला फक्त एका जागेवर समाधान मानावे लागले होते. याचा अर्थ भाजपने 2004 पासून या राज्यात आपले पाय घट्ट रोवण्यास सुरवात केली होती. पुढे आलेल्या मोदी लाटेत भाजप अधिकच भक्कम झाला. पार्श्वभूमी ही अशी असली, तरी या निवडणुकीत मात्र भाजपच्या जागा कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. क्रमांक एकचा पक्ष म्हणून भाजप आपले स्थान कायम ठेवेल; पण काँग्रेसच्या जागा निश्चित वाढतील, कारण यावेळी परिस्थिती बदलली आहे. याशिवाय भाजपपुढे बंडाळीचे आव्हान असताना काँग्रेसने योग्य व्यक्तींना दिलेली उमेदवारीही त्या पक्षाला तारण्याचीच शक्यता आहे.