नथूराम तांबडकर यांचा आठ गुंठ्यात यशस्वी प्रयोग
| कोर्लई | वार्ताहर |
मुरुड तालुक्यातील मजगाव येथील शेतकरी नथूराम तांबडकर यांनी आपल्या शेतात आरोग्याला फायदेशीर असलेल्या काळ्या तांदळाची शेती पिकवून यशस्वी प्रयोग केला आहे.
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या सेवेतून निवृत्त झाल्यानंतर नथूराम तांबडकर मजगावमध्ये आपल्या शेतात फळपीक तसेच नवनवीन भात बियाणांचा वापर करून अधिक उत्पादन देणार्या वाणाची निवड करत असतात. यंदा नेहमीप्रमाणे वाडा कोलमऐवजी त्यांनी सिंधुदुर्ग-वेंगुर्ला येथून 500 रुपये किलो दराने दोन किलो बियाणे ऑनलाईन मागवून 14 जूनदरम्यान पेरा केला. त्यासाठी शेतात सेंद्रिय खताचा वापर केला. त्यांना अवघ्या आठ गुंठ्यात काळ्या तांदळाचे समाधानकारक पीक मिळाले आहे. काळ्या तांदळाच्या शेतीचा प्रयोग यशस्वी झाल्याने समाधान व्यक्त केले असून, पुढील वर्षी शेतात अधिक प्रमाणात काळ्या तांदळाची शेती करण्याचा मानस व्यक्त केला आहे.
काळा तांदूळ हा तांदळाचा एक प्रकार आहे. यात तंतुमय पदार्थ (फायबर), तसेच लोह व तांबे या घटकांची मात्रा नेहमीच्या तांदळापेक्षा अधिक असते. तसेच उच्च गुणवत्तेचे वनस्पती प्रथिन असते. यात अँटिऑक्सिडंटची मात्राही अधिक असते. हा शिजविल्यानंतर गडद जांभळ्या रंगाचा भात होतो. ऐकून आश्चर्य वाटेल की, तांदळाची ही प्रजाती आरोग्यासाठी फायदेशीर आहे.
काळ्या तांदळाची (ब्लॅक राईस) शेती आरोग्यासाठी लाभदायक असून, उत्पादनदेखील चांगले मिळते. शेतकर्यांनी आपल्या शेतात काळ्या तांदळाची शेती केल्यास नक्कीच फायदेशीर ठरेल, असा विश्वास नथूराम तांबडकर यांनी ‘कृषीवल’शी बोलताना व्यक्त केला आहे.
याचे सहा फायदे आहेत
1) लठ्ठपणा: जे लोकं लठ्ठपणा करण्यासाठी भात खाणे टाळतात, त्या लोकांसाठी काळे तांदूळ फायदेशीर आहेत.
2) हृदय: हृदयाच्या आरोग्यासाठी काळे तांदूळ फायदेशीर आहे. यात आढळणारे फायटोकेमिकल कोलेस्ट्रॉलवर नियंत्रण ठेवतात. हे वाईट कोलेस्ट्रॉल कमी करण्यात मदत करतात. याव्यतिरिक्त हे हृदय रक्तवाहिन्यांमध्ये अर्थ्रोस्क्लेरोसिस प्लेक निर्मितीची शक्यता कमी करतात ज्याने हार्ट अटॅक आणि स्ट्रोकची शक्यता कमी होते.
3) पचन: यात भरपूर मात्रेत फायबर आढळतं जे बद्धकोष्ठतासारख्या समस्या दूर करतात. याने पोट फुलणे आणि पचनसंबंधित तक्रारही दूर होते. दररोज याचे सेवन केलं जाऊ शकतं.
4) रोग: काळ्या तांदळात एंथोसायनिन नामक अँटीऑक्सीडेंट भरपूर मात्रेत आढळतं, जे कार्डियोवेस्कुलर आणि कर्करोग सारखे रोग टाळण्यात मदत करतं. याने रोग प्रतिकारशक्ती वाढते.
5) अँटीऑक्सीडेंट: या तांदळांचा गडद रंग यात आढळणारे विशेष अँटीऑक्सीडेंट तत्त्वांमुळे आहे जे आपल्या त्वचा आणि डोळ्यांसाठी फायदेशीर आहे आणि मेंदूसाठीही.
6) शरीर साफ करणारे: अभ्यासात सिद्ध झाले आहे की काळ्या तांदळाचे सेवन शरीरातून हानिकारक आणि नको असलेले तत्त्वांना बाहेर फेकून आंतरिक सफाईमध्ये मदत करतं. हे लिव्हरला स्वच्छ करण्यातही मदत करत असते. यामुळे आरोग्याच्या दृष्टीने काळ्या तांदळाची शेती फायदेशीर ठरते आहे.