65 कुटुंबियांना ब्लँकेट, तर विद्यार्थ्यांना स्वेटर वाटप
। नेरळ । प्रतिनिधी ।
कर्जत तालुक्यातील दुर्गम भागातील तुंगी येथे जावून तेथील 65 आदिवासी कुटुंबियांना थंडीपासून बचाव करण्यासाठी ब्लँकेटचे वाटप करण्यात आले. त्याचवेळी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना आणि तुंगी प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना स्वेटर वाटप करण्यात आले.
ग्रामपंचायत हद्दीतील अतिशय दुर्गम भागातील उंचीवर वसलेले गाव तुंगी येथे जीवनावश्यक वस्तूंचे वाटप आणि ब्लँकेट वाटप रामचंद्र काळू लोखंडे यांच्या स्मरणार्थ त्यांचे पुत्र सचिन रामचंद्र लोखंडे यांच्या माध्यमातून करण्यात आले. दुर्गम भागातील तुंगी येथे जाऊन तेथील जिल्हा परिषद शाळेत शिकणारी 40 विद्यार्थ्यांना शालेय वस्तू तसेच स्वेटर यांचे वाटप करण्यात आले.
त्याचवेळी डोंगरपाडा आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना स्वेटर वाटप केले. तर, तुंगी गावातील 65 कुटुंबांना त्यांच्या घरी जाऊन थंडीपासून बचाव करण्यासाठी ब्लँकेट भेट दिले. सचिन लोखंडे यांच्या या दातृत्वाबद्दल आणि लोखंडे कुटुंबाला धन्यवाद देण्यात येत आहेत.