। पनवेल । प्रतिनिधी ।
नाईलाज म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना आपण मनावर दगड ठेवून मुख्यमंत्री केलं, असा पुनरुच्चार भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. रुसून न बसता केंद्रातल्या नेत्यांचा आदेश आपण ऐकल्याचंही चंद्रकांत पाटलांनी सांगितलं. पनवेलमधल्या भाजपा कार्यकारिणीच्या बैठकीत पाटील बोलत होते.
एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रिपदावरुन चंद्रकांत पाटलांनी नाराजी व्यक्त केली आहे. पाटील म्हणाले, केंद्रातील नेत्यांनी आदेश दिला आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे झाले आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस झाले. मनावर दगड ठेवून आपण सर्वांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केलं. आपल्याला दुःख झालं. पण आपण दुःख पचवून पुढे गेलो कारण आपल्याला गाडा पुढे हाकायचा होता.
चंद्रकांत पाटील यांनी ‘मनावर दगड ठेवून एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केलं’ असं वक्तव्य केलं होतं. या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना चांगलेच उधाण आले होते. नेटकऱ्यांच्या टीकेनंतर भाजपने खबरदारी घेत प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे ते भाषण आपल्या सर्वच सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून हटवले आहे.
जेव्हा पासून शपथ घेतली तेव्हा सर्व मुंबईत आहेत त्यामुळे आता चला आपल्या घरी कामाला लागू जेव्हा सर्व ठरेल तेव्हा तुम्हाला बोलावलं जाईल आणि तेही वेळेत. नगरपालिका, पालिका निवडणुक लागली आहे. आपल्या मुंबई महापालिका जिंकायची आहे. आगामी काळात आपण खूप परिश्रम घेऊ.नेत्यांनी आदेश करायचा नसतो इच्छा व्यक्त करायची असते आणि आपण त्याच पालन करायचं असतं, असं आवाहनही यावेळी चंद्रकांत पाटलांनी उपस्थित नेत्यांना केलं आहे.