शेकापचा पाठिंबा, अन्य पक्षांची पाठ
| पेण | प्रतिनिधी |
गेली अनेक दिवसांपासून पेण शहरातील नागरिकांना पिण्याचे अशुद्ध पाणी मिळत असल्याची चर्चा सुरु होती. मात्र, यावर कुणीही लोकप्रतिनिधी किंवा पक्षाचे नेते आवाज उठवत नसल्याने अखेर गुरुवारी (दि. 22) माझं पेण संघटनेच्या माध्यमातून पेण शहरातील नगरपालिका इमारतीसमोर मोर्चा काढून रास्ता रोको करण्यात आला. मात्र, ज्या पेणकरांसाठी हा मोर्चा काढण्यात आला होता, त्यांचा अल्प प्रतिसाद पहायला मिळाला.
माझं पेण या संघटनेने सर्व पक्षाच्या राजकीय मंडळींना रास्ता रोकोमध्ये सामील होण्याचे आवाहन केले होते. मात्र, अलिबागच्या माजी उपनगराध्यक्षा अॅड. मानसी म्हात्रे, शेतकरी कामगार पक्षाचे खजिनदार अतुल म्हात्रे आणि शेतकरी कामगार पक्षाच्या पेण तालुका महिला प्रमुख स्मिता पाटील, शिवसेना जिल्हा संघटीका दिपश्री पोटफोडे हे वगळता कोणत्याही राजकीय पक्षाच्या नेते मंडळींनी रास्ता रोकोमध्ये सहभाग घेतला नाही. या रास्ता रोकोमध्ये माझं पेण अंतर्गत सेवानिवृत्त तहसीलदार सुभाष म्हात्रे, सेवानिवृत्त न्यायाधीश दामोदर म्हात्रे, नंदा म्हात्रे, आप्पा सत्वे, राजू पाटील, गणेश तांडेल, संतोष ठाकूर, महेंद्र ठाकूर, अशोक मोकल यांनी आपला सहभाग नोंदविला. मात्र, आम्ही पेणकरांना अशुद्ध पाणी देतच नाही, या मतावर नगरपालिकेचे मुख्याधिकारी जीवन पाटील ठाम राहून आपण माझं पेण समिती, पेण नगरपालिकेचे अधिकारी यांच्या एकत्र समितीच्या माध्यमातून पुन्हा एकदा सर्वांसमक्ष पिण्याच्या पाण्याचे नमुने घेऊन तपासणीसाठी पाठवू असे सांगितले.
पेण शहरात असंख्य समस्या भेडसावत असताना पिण्याच्या पाण्याची महत्त्वाची समस्या सोडविणे गरजेचे होते. त्यातच मधल्या काळात आलेली काविळची साथ लक्षात घेता नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे समस्त पेणकरांनी माझं पेण नावाने एक सोशल मीडियावरील ग्रुप तयार करून सर्वानुमते ठरवून गुरुवारी (दि. 22) नगरपालिकेवर मोर्चा काढून रास्ता रोको केला. या आंदोलनात महिला वर्ग, ज्येष्ठ नागरिक आणि विविध पक्षांच्या पदाधिकार्यांनी सहभाग घेतला होता. पेणकरांना मिळत असणारे अशुद्ध आणि गटाराच्या पाण्याबाबत नगरपालिका प्रशासनाने तातडीने उपाययोजना करावी, त्याचप्रमाणे ज्या गटारांचे पाणी या पिण्याच्या पाण्याच्या प्लांटजवळ जाऊन मिळते त्याचा मार्ग बदलावा आणि शहरातील पिण्याच्या पाण्याच्या चाव्यांवर झाकणे लावण्यात यावीत यांसह अनेक मागण्या या आंदोलनाच्या माध्यमातून माझं पेण समितीने मांडल्या. त्यावर उपाययोजना म्हणून लवकरच आपल्याकडे आमदार रवींद्र पाटील यांच्या पाठपुराव्यातुन पेणकरांच्या शुद्ध पाणी तसेच पुढील वीस ते पंचवीस वर्षे पुरेल असे मुबलक पाण्यासाठी आपण हेटवणे आणि आंबेगाव धरणाचे पाणी उचलणार असून, त्या योजनेसाठी 149 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध होत आहे, त्याची अंतिम मंजुरी मंत्रालय स्तरावर लवकरच होणार असल्याचे स्पष्टीकरण मुख्याधिकारी जीवन पाटील यांनी सांगितले. त्याचप्रमाणे पुन्हा एकदा आपण सर्वांच्या समक्ष पाण्याचे नमुने घेऊन तपासणीसाठी पाठवू असे सांगून महिनाभरातच शहरातील पाण्याच्या चाव्यांवर झाकणे टाकून ते बंदिस्त करण्यात येतील, असेही जीवन पाटील यांनी सांगितले.
श्रेयासाठी चढाओढ
ज्या हेतूने रास्ता रोको करण्याचे आम्ही पेणकर संघटनेने ठरविले होते, तो हेतू साध्य होण्यापेक्षा आंदोलनकर्त्यांमध्ये श्रेयासाठी चढाओढ पहायला मिळाली. तसेच आंदोलनकर्त्यांपेक्षा पोलीस आणि प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधीच जास्त होते. या आंदोलनासाठी हजार माणसे जमतील अशी अपेक्षा आंदोलनकर्त्यांंना असतानाच पेण शहरातील नागरिकांनी अशरक्षः या आंदोलनाकडे पाठ फिरवल्याचे पहायला मिळाले.