अपुर्या कर्मचार्यांमुळे नाहक मनस्ताप
| उरण | वार्ताहर |
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेंतर्गत महिलांच्या खात्यात दोन महिन्यांचे तीन हजार रुपये नुकतेच जमा झाले. हे पैसे आले की नाही हे पाहण्यासाठी व ते काढण्यासाठी महिलांची बँकेत मोठी गर्दी उसळत आहे. मात्र, उरण तालुक्यातील सर्रास बँकेतील अपुर्या कर्मचार्यांच्या संख्येमुळे मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणींना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. तरी, मुख्यमंत्र्यांनी प्रथमतः बँकेतील रिक्त पदे भरण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी ओरड आता लाडक्या बहिणींकडून केली जात आहे.
राज्य सरकारने महिलांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली. या योजनेंतर्गत महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जाणार आहेत. या योजनेचे पहिल्या दोन महिन्यांचे पैसे लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा झाले. आपल्या खात्यात पैसे आले की नाही, तसेच हे पैसे काढण्यासाठी आपापल्या परिसरातील बँकेत मोठ्या प्रमाणात लाडक्या बहिणींची झुंबड उडाली आहे. मोठ्या प्रमाणात महिला आल्याने बँकेच्या व्यवस्थापनावर बँकेतील अपुर्या कर्मचार्यांमुळेदेखील ताण पडत आहे. त्यात काही महिलांचे केवायसी नसल्याने त्यांना त्यांच्या खात्यात पैसे आले की नाही हे पाहण्यासाठी गर्दी होत असल्याचे दिसून येत आहे. तर, तालुक्यातील अनेक महिलांनी पासबूक घेऊन ते अपडेट करण्यासाठी उन्ह-पाऊस झेलत बँक परिसरात रांगा लावल्याचे दिसून येत आहे. तरी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या लाडक्या बहिणीची होणारी गैरसोय दूर करण्यासाठी बँकेतील रिक्त पदे भरण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी बहिणींकडून केली जात आहे.