ठिकठिकाणी डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
भारतरत्न घटनेचे शिल्पकार, महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त संपूर्ण रायगड जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी ठिकठिकाणी रॅली, समाजोपयोगी उपक्रम यामुळे संपूर्ण जिल्ह्यात निळा महासागर उसळल्याचाच भास होत होता.
अलिबाग शहरातील आंबेडकर चौक निळमय झालेल पहावयास मिळाले. भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त शहरातील बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्याला नागरीकांनी मोठया संख्येने आभिवादन केले. मोठ्या उत्साहात 131 व्या जयंती निमित्त 82 ठिकाणी मिरवणूका हि काढण्यात आल्या. अलिबागचे माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक व इतर सामाजिक संघटनांच्या वतीने अलिबाग शहारातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन केले. महाडमध्ये चवदार तळ्याजवळ डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनुयायांनी मोठी गर्दी केली होती. दिवसभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी चवदार तळे परिसरातील बाबासाहेबांच्या पुतळ्याजवळ अनेकांनी महामानवाला अभिवादन केले. अलिबाग शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्याठी अलिबागच्या माजी उपनगराध्यक्षा अॅड. मानसी म्हात्रे, प्रदीप नाईक, संजना किर, राकेश चौलकर, महेश शिंदे आदि उपस्थित होते.
जिल्हाधिकारी कार्यालयात देखील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले. नगरपालिका इमारतीत महामानवाला अभिवादन करण्यात आले. आरसीएफ कुरुळ कॉलनी येथील बुद्ध विहारात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोस्तवाचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील दोन्ही बुद्ध विहारात विविधी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्त विविध कार्यक्रम, मिरवणुका, चर्चासत्रे, शिबिरे आयोजित करून बाबासाहेबांना अभिवादन केले. यावेळी डॉ. आंबेडकर यांच्या प्रागतिक विचारांना उजाळा देण्यात आला. जयंतीनिमित्त ठिकठिकाणी मिरवणुका काढण्यात आल्याने शहर व ग्रामीण भागात निळे वादळ निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले.