खंदेरीच्या वेताळ देवाचे दर्शन घेऊन मुरुडकडे रवाना
। मुरुड । वार्ताहर ।
मागील वर्षांपासून पासून वादळी वारे अवकाळी पाऊस व तद्नंतर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर झालेला लॉकडाऊनमुळे स्थानिक मच्छिमार मेटाकुटीला आला होता. परंतु अजूनही संकटाचे ग्रहण सुटत नाही सध्या कोळीबांधवांना खोल समुद्रात मत्स्यदुष्काळाचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे होळी सण साजरा करण्यासाठी कोळीबांधवांच्या होड्या पाच सहा दिवस आधीच किनारी लागल्याचे दिसून येत आहे.
आपली संस्कृती जपत आपला पारंपरिक होळी (शिमगा) सण आनंदाने साजरा करण्यासाठी कोळी बांधव सज्ज झालेला दिसून येत आहे. होळी हा सण कोळी समाजामध्ये आवडता सण असून तो फार श्रद्धेने साजरा केला जातो, या सणाला कोळीबांधव आपल्या होड्या स्वच्छ धुवून, त्याला रंगीबेरंगी कापडीपट्ट्या, झुली, वेगवेगळ्या रंगाचे झेंडे व होडीला फुलांच्या माळा लावून होड्या किनारी लावतात. किनारी येताना फटाक्यांची आतषबाजी, गुलालाची उधळण करीत वाद्याच्या तालावर नृत्य करीत मोठ्या उत्साहात किनार्यावर येतात.
रायगड जिल्ह्यामधील सुमारे दहा हजारपेक्षा जास्त होड्या होळी सण साजरा करण्यासाठी सागरी किनार्याला येत असतात, कोळीबांधव गावात आल्यानंतर आपले कुटुंबीय नातेवाईक व मित्रमंडळींबरोबर रममाण होऊन होळीसण उत्साहात साजरा करून सात ते आठ दिवसांनंतर परत मासेमारीसाठी जाण्यासाठी जाळ्या व इतर सामान भरून सज्ज होतात. मोठ्या संख्येत किनार्याला सजविलेल्या होड्यां लागल्याने किनार्यावरील दृश्य विलोभनीय दिसते.
होळी सण हा कोळी समाजाचा आवडता सण असून दरवर्षी प्रथेप्रमाणे खांदेरी किल्ल्यावरील वेताळ देवाचे दर्शन घेण्याची आमची परंपरा आहे. येथे केलेली प्रार्थना नेहमी सफल होते अशी आमची भावना आहे .त्यामुळे खांदेरी किल्ल्यावरील वेताळ देवाचे दर्शनासाठी मोठी गर्दी असते.
– चंद्रकांत सरपाटील, एकविरा व कमलावती होड्यांचे मालक, मुरुड