| कर्जत | वार्ताहर |
कर्जत चारफाटा ते रेल्वे कॉलनी शेजारील झुडपांत एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. साधारणतः 55 वर्षीय पुरुषाचा हा मृतदेह अंदाजे दहा दिवसांपूर्वी मृत झाल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.
कर्जत चारफाटा ते रेल्वे कॉलनी शेजारील झुडपांमधून येणाऱ्या दुर्गंधीमुळे रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांनी संशय घेतला आणि घटनेची माहिती पोलिसांना दिली. कर्जत पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक गायकवाड आणि पोलीस हवालदार वडते घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह शवविच्छेदनासाठी कर्जत उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.
सडलेल्या अवस्थेतील मृतदेह घटनास्थळी आढळून येणे आणि तो अंदाजे दहा दिवसांपासून तिथे असण्याची शक्यता असल्यामुळे, यामागे घातपाताचा संशय वर्तवण्यात येत आहे. मृत व्यक्तीचा मृतदेह याठिकाणी कसा पोहोचला ? त्याचा खून करण्यात आला आहे का? किंवा हा अपघात आहे का? यासंबंधी तपास सुरू आहे. घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, नागरिकांमध्ये वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. मृतदेह सडलेल्या अवस्थेत असल्याने त्याची ओळख पटवणे कठीण झाले आहे. कर्जत पोलीस नागरिकांच्या मदतीने मृत व्यक्तीची ओळख पटवण्याचा प्रयत्न करत आहेत. कोणत्याही प्रकारची महत्त्वाची माहिती असल्यास, ती कर्जत पोलीस ठाण्याला कळवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पोलीस निरीक्षक सुरेंद्र गरड यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू असून, घातपात, अपघात किंवा इतर कोणताही दृष्टिकोन यामधून हा गुन्हा घडला आहे का याचा तपास सुरु आहे.