। खोपोली । प्रतिनिधी ।
कोरोना सारख्या महामारीच्या आजाराने थैमान घातले असताना खोपोली पालिकेचे कर्मचारी व अधिकारी यांनी स्वतःचा व आपल्या कुटुबीयांचा जीव धोक्यात टाकून शहरातील कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी दिवसरात्र झटत आहेत. त्यामुळे सर्व कामगार वर्गाला 21 हजार 500 रुपये सानुग्रह अनुदान जाहीर केल्याने या निर्णयाचे सर्व कामगार कर्मचारी व युनियनने प्रशासनाचे आभार व्यक्त केले. खोपोली शहरासह सर्वत्र भीतीचे सावट असताना खोपोली पालिकेच्या कामगार व कर्मचारी वर्गाने जीवावर उदार होऊन कुटुंबाचा ही विचार न करता कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असताना रुग्णांना आणि त्यांच्या संपर्कातील येणार्या बाधित झालेल्याचा शोध घेवून त्यांच्यावर उपचार करणे, रुग्ण आढळून आलेला विभाग स्वच्छ करणे, औषधे फवारणी करणे, गरजू लोकांना अन्नधान्य वाटप करणे, रुग्णालयात रुग्णांना वेळेवर औषधे देणे, आँक्सिजन पुरवठा करणे, कोरोनामुळे मृत झालेल्या लोकांचा अंत्यविधी करणे आदी महत्वाची सेवा स्वतःच्या जिवाची पर्वा न करता अहोरात्र करीत होते. त्यामुळे भारतीय कामगार कर्मचारी महासंघ युनिटच्या वतीने आम्हाला 31 हजार रूपये बोनस देण्यात यावा अशी मागणी निवेदनाद्वारे केली होती. त्यानुसार नगराध्यक्षा सुमन औसरमल उपनगराध्यक्षा विनिता कांबळे मुख्याधिकारी अनुप दुरे सर्व गटनेते नगरसेवक नगरसेविका व युनियन अधिकारी यांनी सकारात्मक भूमिका घेऊन 21 हजार 500 रुपये सानुगृह अनुदान जाहीर केल्याने कामगार स्थानिक प्रतिनिधी दिलीप सोनावणे यांनी कामगारांच्या वतीने आभार मानत आनंद व्यक्त केला असून फटाक्यांची आतषबाजी करून या निर्णयाचे स्वागत केले आहे.