रेवदंडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घटना उघडकीस; 23 जणांविरोधात गुन्हा दाखल
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
रायगड जिल्ह्यात सामाजिक बहिष्काराचे आणखी एक प्रकरण समोर आले आहे. मुरुड तालुक्यातील चोरढे गावातील एका समाजाने तक्रारदार यांच्या कुटुंबाला मंदिराच्या जागेच्या वादातून पंच कमिटीने बहिष्कृत केले असल्याची तक्रार रेवदंडा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. त्यानुसार 23 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे रायगड जिल्ह्यातील जात पंचायती आणि गाव पंचायतीच्या जाचादा मुद्दा ऐरणीवर आला आहे. रेवदंडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चोरढे येथेदेखील वाळीत तथा सामाजिक बहिष्काराचे प्रकरण समोर आले आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, चोरढे गावातील एका समाजातील ग्रामस्थांनी गावातील जुन्या हनुमान मंदिराच्या जागेत नवीन मंदिराचे बांधकाम केले. त्या मंदिरालगत असलेली छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाची जागा बदलून 13 फेब्रुवारी 2025 मध्ये ते स्मारक तक्रारदार यांच्या मालकीच्या जागेत तसेच येण्या-जाण्याच्या मुख्य रस्त्यात वाहनांना अडथळा निर्माण होईल, अशा ठिकाणी बांधले. ही जागा बदलावी, यासाठी एका समाजाच्या पंचांबरोबरच शासनाकडे तक्रार केली होती. तसेच बांधकामाविरोधात दिवाणी न्यायालयात दावा दाखल केला होता. या गोष्टीचा राग धरून चोरढे गावातील त्या समाजाचे पंच मंडळाचे पदाधिकारी, सदस्य अशा एकूण 23 जणांनी एप्रिल ते मे या कालावधीत गावातील हनुमान मंदिरात गावकाची सभा घेतली, असे तक्रारदारांचे म्हणणे आहे. या सभेत तक्रारदारांच्या हजेरीचा पुकार न करणे, पाठविलेली वार्षिक वर्गणी न स्वीकारणे, तक्रारदारांच्या कुटुंबाशी कोणीही संबंध न ठेवणे, पीडित कुटुंबाशी संबंध ठेवणाऱ्यास प्रत्येकी रूपये पाच हजार रूपये दंड ठेवण्यात येईल, असा ठराव करून सामाजिक बहिष्कार टाकण्यात आला आहे. या घटनेमुळे रायगड जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
वाळीत प्रकरणावर अंकुश ठेवण्यासाठी रायगड जिल्ह्यात पोलीस दलामार्फत मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात आली होती. त्यानंतर काही प्रमाणात सामाजिक बहिष्काराच्या घटना रोखण्यात आल्या. मात्र, पुन्हा एकदा जिल्ह्यामध्ये विशेष म्हणजे रेवदंडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाळीत प्रकरणे वाढत असल्याचे चित्र समोर आले आहे. आता चोरढेमध्ये सामाजिक बहिष्काराची घटना घडली असून, हे प्रकार थांबेनात, असे चित्र दिसून येत आहे.
रायगड जिल्ह्यामध्ये सामाजिक बहिष्काराच्या घटना मागील काही वर्षांपूर्वी मोठ्या प्रमाणात झाल्या होत्या. समाजातून वगळण्याचे प्रकार वाढले होते. सामाजिक, आर्थिक, मानसिक व शारीरिक त्रास दिला जात होता. सामाजिक बहिष्काराची 47 प्रकरणे झाली होती. त्याची दखल राज्य शासनाला घ्यावी लागली. अखेर त्यावर कायदा तयार करण्यात आला. जिल्ह्यातून वाळीत प्रकरण हद्दपार करण्यासाठी रायगड पोलिसांनी कंबर कसली होती. जनजागृतीपर उपक्रम राबविले जात होते. वाळीत टाकणाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले होते. यानंतर काही प्रमाणात हे प्रकरणांवर अंकुश राहिला. मात्र, रायगड जिल्ह्यात पुन्हा सामाजिक बहिष्कार प्रकरणाने डोके वर काढण्यास सुरुवात केली आहे.
वाळीत प्रकरणाच्या घटना घडू नये, यासाठी वारंवार ग्रामपंचायतीला सूचना करण्यात आल्या आहेत. गावबैठकांच्या माध्यमातून याबाबत जनजागृती करण्यात येणार आहे. चोरढे येथील वाळीत प्रकरणाची घटना उघड झाल्यावर तात्काळ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याबाबत तपास अधिक सुरु आहे.
श्रीकांत किरवले,
सहाय्यक पोलीस निरीक्षक, रेवदंडा






