जंजिर्‍याच्या पर्यटनाला ब्रेकवॉटर, जेटीची तटबंदी; पर्यटकांचा प्रवास होणार अधिक सुरक्षित

दोन वर्षांत 93.56 कोटी खर्चून होणार बांधकाम

| मुरुड जंजिरा | प्रतिनिधी |

जंजिरा किल्ला पर्यटकांचे मुख्य आकर्षण आहे. किल्ल्यात शिडाच्या बोटीने गेल्यावर प्रवेशद्वारावर उतरणं व चढणं पर्यटकांसाठी मोठे कठीण होते. त्यासाठी मागील सहा वर्षांपासून किल्ल्यात जाण्यासाठी ब्रेकवॉटर (भिंत), जेटी बांधण्याची मागणी करण्यात आली होती. पुरतत्व खात्याच्या अनेक परीक्षणांनंतर या ठिकाणी 93.56 कोटी रुपये खर्चून जेटी व बे्रकवॉटरचे काम करण्यात येणार आहे. या कामाची निविदा 27 ऑक्टोबरला निघाली असून, निविदा भरण्याची शेवटची तारीख 21 नोव्हेंबर 2022 आहे. पुढील दोन वर्षांत जेटीचे काम पूर्ण होईल, अशी माहिती मेरीटाईम बोर्डाचे अधिकारी सुधीर देवरे यांनी दिली.

दरम्यान, किल्ल्यात जाताना समुद्राच्या लाटांचा मारा होत असताना बोट 10 फूट वर जाऊन काही सेकंदात खाली येते, त्यावेळी पर्यटकाला आपला तोल सांभाळून जीव मुठीत घेऊन उतरावे लागत होते. ते सुरक्षित नसल्याने किल्ल्यावर अद्यावत जेटी असावी, अशी मागणी झाली. गेली सहा वर्षे अथक प्रयत्नांनंतर पुरतावत्व खात्याच्या अनेक परीक्षणानंतर किल्ल्याच्या पश्‍चिमेकडे जेटी बनवण्याची परवानगी मिळाली. 500 पर्यटक सुरक्षित उतरतील, अशी भव्य जेटी बनणार व समुद्राच्या लाटांचा प्रभाव कमी करण्यासाठी 250 फूट लांबीचा ब्रेकवॉटर (भिंत) 93.56 कोटी खर्चून बनवण्यात येणार आहे, अशी माहिती श्री. देवरे यांनी दिली.

श्री. देवरे पुढे म्हणाले की, सध्या पर्यटक किल्ल्यात जातात तो किल्ल्याचा मागील प्रवेशद्वार आहे. किल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार पश्‍चिमेला असल्याने पुरातत्त्व विभागाने व तज्ज्ञ मेरीटाईम बोर्डाच्या अधिकार्‍यांनी पाहणी करून समुद्राच्या लाटांची तीव्रता पाहून ही जागा निवडली आहे. पश्‍चिमेकडील प्रवेशद्वार मोठे व 600/100 फुटांचा धक्का असल्याने जेटी बनवण्यास सुलभ होईल व राजपुरीकडून दिसणार्‍या किल्ल्याच्या सुंदरतेत कोणतीही बाधा येणार नाही. या जेटीचे बांधकाम मेरीटाईम बोर्डाची तज्ज्ञ टीम करणार आहे. सर्व संभाव्य त्रुटींचा विचार करून जेटीचे सुरक्षित व वापण्यास सहज सोपे असे बांधकाम असेल. किल्ल्याच्या पश्‍चिमेकडे प्रशस्त दगडी बांधकाम केलेले ग्राऊंड असल्याने पर्यटकांना तेथे बसून निसर्गरम्य विशाल समुद्राचा मनोसोक्त आनंद घेता येईल. मुरुड तालुक्यात मेरीटाईम बोर्डाने मुरुड खोराबंदर जेटी व पार्किंग, राजपुरी जेटी, आगरदांडा जंगल जेटी, कार्यालय व पार्किंग, दिघी जंगल जेटी व पार्किंग अशी तीन कामे गेल्या पाच वर्षांत केली आहेत. आज तीनही जेटी वापरण्यास रद्द झाल्यात आहेत.राजपुरी येथील जेटी भरतीला करंट असल्याने शिडाच्या बोटी लागत नसल्याची तक्रार अनेकवेळा करूनदेखील जेटीची सुधारणा केली गेली नाही. सध्या बोटी जुन्या पडक्या जेटीला लावून प्रवाशांना किल्ल्यात नेण्याचे काम सुरु आहे.

खोरा बंदरातील जेटीची लांबी कमी असल्याने ओहोटीला किल्ल्यात जाणार्‍या बोटी लागत नाही व पार्किंग बनून तीन वर्षे झाली; परंतु वापर नाही. आगरदांडा जंगल जेटी बनून चार वर्षे झाली. भरती-ओहोटीला समुद्राचे पाणी उलट फिरत असल्याने दिघीला जाणार्‍या जंगल जेटी बोटी सध्या खासगी जुन्या जेटीला लागत असून, नवीन जेटी पूर्णतः फुकट गेली आहे. कोळी बांधव मासळी सुकवण्यासाठी तिचा वापर करत आहेत. ही बांधकामे मेरीटाईम बोर्डाच्या तज्ज्ञ टीमने केलीत, मग ह्या त्रुटी का राहिल्या? शासनाची करोडो रुपयांची मालमत्ता वापराविना पडून आहे. या चारही जेटींचे टेंडर अनेकवेळा निघाले; परंतु जेटी निकामी असल्याने कोणीही टेंडर भरले नाही. अशारितीने शासनाने खर्च करून मालमत्ता पडून राहिल्या, याला जबाबदार कोण? असा मुरुडकरांचा प्रश्‍न आहे.

आता नव्याने होणार्‍या जंजिरा किल्ल्यातील जेटीचे असे होऊ नये म्हणून मेरीटाईम बोर्डाने काळजी घ्यावी. स्थानिकांना विश्‍वासात घेऊन परिसरातील कोळी बांधव, शिडाच्या बोटींचे मालक व अनेक वर्षे खोल समुदारात प्रवास करणारे जाणते कोळी यांचा सल्ला घेऊन जेटी बांधण्यात यावी, अशी मुरुडकरांची इच्छा आहे.

Exit mobile version