| पनवेल | वार्ताहर |
दुकानाच्या मालमत्ता कर पावतीवर नाव नोंदविण्यासाठी पाच हजारांची लाच घेणाऱ्या पनवेल महापालिकेच्या लिपिकाला नवी मुंबई लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे. विश्राम म्हात्रे असे या लिपिकाचे नाव असून, नावडे उपविभाग कार्यालयात ही कारवाई करण्यात आली. महापालिकेच्या स्थापनेनंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून लाचखोराला पकडण्याची झालेली ही पहिलीच कारवाई आहे.
पनवेल महापालिकेत नावडे उपविभागात काम करणारा लिपिक विश्राम म्हात्रे याच्याकडे नावडे उपविभागाचा प्रभाग अधिकारी म्हणून अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे. या विभागातील तोंडरे गावातील दुकानाच्या मालमत्ता करपावतीत नाव नोंदणी करण्यासाठी विश्राम म्हात्रे याने तक्रारदाराकडून पाच हजार रुपयांची मागणी केली होती. त्यामुळे या दुकानदाराने नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे याबाबत तक्रार केली होती. त्यानुसार पोलीस उपअधीक्षक शिवराज म्हेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली नावडे उपविभाग कार्यालयात सापळा लावण्यात आला होता. यावेळी तक्रारदाराकडून पाच हजारांची लाच स्वीकारताना विश्राम म्हात्रे याला रंगेहाथ पकडण्यात आले. तळोजा पोलीस ठाण्यात या प्रकरणाची नोंद करण्यात आली आहे.