| मुंबई | प्रतिनिधी |
सीमा शुल्क विभागाने मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज विमानतळावर केलेल्या कारवाईत बँकॉकहून आलेल्या दोन प्रवाशांकडून सव्वा आठ किलो गांजा जप्त केला आहे. जप्त करण्यात आलेल्या गांजाची किंमत सव्वा आठ कोटी रुपये आहे. दोन्ही आरोपींविरोधात सीमाशुल्क कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बँकॉकहून येणारे संशयीत प्रवासी तेथून गांजा घेऊन येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्या आधारे शनिवारी बँकॉकहून आलेल्या सागर वधीया व निगम रावल या प्रवाशांना थांबवण्यात आले. त्यांच्या अंगझडतीत संशयीत अमलीपदार्थ सापडला. त्यानंतर त्यांचे सामान तपासले. त्यावेळी सामानातील पाकिटांमध्ये संशयी अमलीपदार्थ सापडले. तपासणीत तो गांजा असल्याचे निष्पन्न झाले. सागरकडून चार किलो 69 ग्रॅम गांजा, तर रावलकडून चार किलो 89 ग्रॅम असा दोघांंकडून मिळून एकूण आठ किलो 155 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे. त्याची किंमत सव्वा आठ कोटी रुपये असल्याची माहिती सीमाशुल्क अधिकाऱ्याने दिली. आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.आरोपींनी यापूर्वीही अशाप्रकारे गांजाची तस्करी केल्याची माहिती मिळाली आहे. दोघांनी यापूर्वीही दोनवेळा अशा प्रकारे गांजाची तस्करी केली असून या प्रकरणामागे आंतरराष्ट्रीय अमलीपदार्थ तस्करांच्या टोळीचा सहभाग असल्याचा सीमाशुल्क विभागाला संशय आहे. दरम्यान याप्रकरणी अमलीपदार्थ प्रतिबंधक कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करून दोन्ही आरोपींना अटक करण्यात आले. याप्रकरणात सहभागी असलेल्या काही संशयितांची माहिती सीमाशुल्क विभागाला मिळाली असून त्याद्वारे सीमाशुल्क अधिकारी अधिक तपास करत आहेत.