जिल्ह्यात विशेषत: ग्रामीण भागात होलिकोत्सव साजरा करण्याची मोठी परंपरा आहे. या प्रदीर्घ परंपरेला शिमगा किंवा होळी म्हणतात. जिल्ह्यात हा होळीकोत्सव जोरदारपणे साजरा केला जातो. होळीचे आजचे स्वरूप बदलले असले तरी येथील काही जुन्या परंपरा अजून कायम टिकून आहेत. प्रत्येक गावागावात वाडीवस्तीत होळीचा सण आनंदाने साजरा केला जातो.
![](http://krushival.in/grygrars/2024/03/sudhir-2-1024x504.jpg)
मुरुड कोळीवाड्यातील होळीची परंपरा
भारतभर होळी मोठ्या उत्साहामध्ये साजरी केली जाते. हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे होळीचा सण फाल्गुन महिन्यामधील पौर्णिमेच्या दिवशी साजरा करण्याची प्रथा आहे. होळीच्या दिवशी रात्री होलिका दहन असते. शहरांमध्ये होळीच्या दुसर्या दिवशी रंग खेळले जातात. होळी पौर्णिमेनंतर पाच दिवसांनी रंगपंचमी येते. पूर्वी होळी-रंगपंचमीनंतर उन्हाळ्याला सुरुवात झाली असे म्हटले जात असे. मुरुड तालुक्यात होळीचे थोडे वेगळे रूप पाहायला मिळविते. होळी (शिमगा ) सण प्रामुख्याने कोळिसमजात मोठ्या उत्साहात साजरा केला गेला. मुरुडच्या प्रथेनुसार 15 दिवस अगोदर होळीला होळीच्या माळावर छोटी होळीसाठी खडा खणून त्यात रात्री सुपारीचे झाड होळीत जाळले जाते. लहान मोठे सर्वच होळीच्या सणात सामील होतात. ढोल ताशा वाजवत नाचत दिवस संपतो.
![](http://krushival.in/grygrars/2024/03/tala-8-768x1024.jpg)
तळा शहरात होळीचा सण व धुळवड साजरी
तळा शहरात पारंपरिक पद्धतीने होळीचा सण व धुळवड साजरी करण्यात आली. बारा वाड्यातील गावकर्यांनी लाकडे, गवत व फांद्यांनी आपापल्या होळया सजविल्या होत्या. होळी लागण्याआधी महिलांकडून होळीला पुरण पोळीचा नैवेद्य दाखवून तिचे पूजन करण्यात आले. तसेच नवस बोलून नारळ अर्पण करण्यात आले. होळी भोवती गावकर्यांनी फाग म्हणत देवांना आमंत्रण दिले व पाच तरुणांकडून होळी पेटविण्यात आली. जोगवाडी येथील मानाची होळी लागल्यानंतरच ईतर सर्व होळया लागण्याची परंपरा तळा शहरात आजही कायम आहे. ग्रामदेवता चंडिका देवीच्या मंदिरात परंपरेनुसार होळी दहनाची राख एकमेकांना लावण्यात आली. धुळवडीच्या मिरवणुकीसाठी पारंपारिक वाद्यांचा वापर करण्यात आला होता. चंडिका देवीचे दर्शन घेतल्यानंतर पुन्हा होळीच्या स्थानावर जाऊन धुळवड ची सांगता करण्यात आली.
![](http://krushival.in/grygrars/2024/03/kolad-2-461x1024.jpg)
कोलाड विभागात शिमगोत्सव
रोहे तालुक्यातील कोलाड भागातील कोलाड, सुतारवाडी, खांब या ग्रामीण विभागात मोठया उत्साहात शिमगोत्सव साजरा करण्यात आला. होळीनिमित्ताने गावोगावी क्रिकेटच्या स्पर्धा तरुणांनी भरवल्या होत्या. गावरान खालुबाजा पिपेरीच्या स्वराला नगाराचा आवाज व होळीच्या गाण्यांनी सर्वत्र वातावरण मंत्रमुग्ध करणारे ठरले.
![](http://krushival.in/grygrars/2024/03/salim-3-1024x461.jpg)
माणगाव तालुक्यात होळी उत्साहात
माणगाव तालुक्यात रविवारी (दि. 24) होलिकात्सव अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. पारंपारिक पद्धतीने गावागावातून होळी निमित्ताने विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. गावातील प्रथा परंपरांचे पालन करत रात्री ग्रामदेवतेच्या परिसरात होळीच्या माळावरून होळी साजरी करण्यात आली. गावातील घराघरातून लाकूड, बांबू इत्यादी जमा करून होळीच्या माळावर होळ्या रचण्यात आल्या होत्या. परंपरागत रित्या फाग म्हणून आभाळवृद्ध एकत्र येत होळी पेटविण्यात आल्या. या होळीला पुरणपोळीचे नैवेद्य अर्पण करण्यात आले तसेच होळीमध्ये श्रीफळ अर्पण करण्यात आला. पारंपारिक सोंग, भजन इत्यादीने जागरण करण्यात आले. तसेच गावागावातील तरुण, नोकरदार वर्ग मोठ्या प्रमाणात होळी सणासाठी गावाकडे आले होते. तरुणांनी रात्री विविध खेळाचा आनंद घेतला. अत्यंत उत्साह पूर्ण वातावरणात तालुक्यात एकूण 440 होळी लावण्यात आल्या.
रोहा तालुक्यात होळी साजरी
रोहा तालुक्यातील नागोठणे जवळच असलेल्या बाळसई येथे ग्रामस्थ मंडळ, चाकरमानी यांच्या उपस्थितीमध्ये होळी होळी महोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. रात्री 12 वाजण्याच्या सुमारास होळीच्या सभोवताली ढोल-ताशाच्या तालावर गाणी बोलत गावातील सर्व ग्रामस्थ व तरुण नाचण्याचा आनंद लुटत पाच फेर्या पुर्ण झाल्यानंतर होळी पेटविण्यात आली. यावेळी गावातील सर्व ग्रामस्थ, महिला, तरुण व चाकरमानी आनंद लुटत असण्याचा क्षण पहावयास मिळाला.
![](http://krushival.in/grygrars/2024/03/uday-1024x575.jpg)
म्हसळा तालुक्यात होळीकोत्सव साजरा
होळी हा हिंदू बांधवांचा आनंदाचा आणि उत्साहाचा सण. लहानांपासून थोरांपर्यंत प्रत्येकाच्या मनात ऐकतेची आणि अखंडत्वतेची जाणीव करून सुख, समाधान देणारा हिंदू धर्मातील एक महत्वाचा सण म्हणून आजही अनन्यसाधारण महत्व प्राप्त झालेला सण असून होळी संपूर्ण म्हसळा तालुक्यात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. तालुक्यात कोठेही कसलाही प्रकारचा अनुचित प्रकार घडला नाही. तालुक्यात सुमारे 100 ठिकाणच्यागाव आणि वाडीवस्तीवर वेगवेगळ्या प्रकारे सजावट करून हॉलिमध्ये रंग आणण्याचा प्रत्येक गाव आणि वाडीवस्तीवर करण्यात आला. म्हसळा शहरात साधारण सात आठ ठिकाणी होळी साजरी केली जाते परंतू शहराची मुख्य होळी गावदेव श्री धावीर महाराज आणि त्यांचे सहकारी यांच्या नावाचा गजर करून फार मोठ्या उत्साही वातावरणात शहरातील होळीच्या खाचरात पूर्वापार साजरी करण्यात येते. पोलीस निरीक्षक पवन चौधरी यांनी आपल्या सहकार्यांच्या माध्यमातून संपूर्ण तालुक्यात चोख बंदोबस्त तैनात केला होता.
![](http://krushival.in/grygrars/2024/03/nazare.jpg)
बोर्ली नगरीत चिंचबादेवी मंदिराच्या होळीच्या पटांगणावर होळीचा क्षण पाहण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.