प्रवाशांसह वाहनचालकांना दिलासा
| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत शहरात प्रवेश करणाऱ्या कर्जत चारफाटा भागातून जाणाऱ्या रेल्वे पुलावरील खड्डे भरण्यास सुरुवात झाली आहे. पुलावरील खड्डे भरण्यात येत असल्याने स्थानिक वाहनचालक आणि प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. दरम्यान, आमदार महेंद्र थोरवे यांनी राज्य रस्ते विकास महामंडळाला सांगून खड्डे भरून घेतल्याने रस्ता खड्डेमुक्त बनला आहे.
कर्जत शहरात प्रवेश करण्यासाठी सर्वाधिक वाहतूक कोंडीचा रस्ता समजला जाणारा रेल्वे पुलावरील खड्डे वाहतूक कोंडीला कारणीभूत ठरत होते.त्याबाबत वाहनचालक यांच्याकडून नाराजी व्यक्त केली जात असल्याने पावसाळ्यात ते खड्डे वाहनांचा प्रवास अडथळता बनवतील अशी शक्यता निर्माण झाली होती. मात्र आमदार महेंद्र थोरवे यांनी राज्य रस्ते विकास महामंडळाचे उप अभियंता यांना सांगून त्यावरील खड्डे तात्काळ भरण्याची सूचना केली होती. त्यानंतर 22 जून रोजी सुरू झालेला पाऊस पुन्हा गायब झाल्याने राज्य रस्ते विकास महामंडळ यांच्याकडून रेल्वे पुलावरील खड्डे भरण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली. खड्डे भरून त्यावर रोलर फिरवला जात असल्याने वाहनचालक यांच्याकडून आनंद व्यक्त केला जात आहे.
दरम्यान, या पुलाच्या बाजूला नवीन पूल बनवावा, अशी अनेक वर्षे मागणी केली जात आहे. मात्र बांधकाम खात्याने तेथे नवीन पूल निर्माण करण्याचे कोणतेही अंदाजपत्रक अद्याप तयार केलेले नाही. या नवीन पुलाच्या शेजारीच कर्जत उपनगर रेल्वे स्थानक निर्माण होत आहे. त्यावेळी उपनगरीय लोकल याच भागातून हार्बर आणि मध्य रेल्वे कडे सोडल्या जाणार आहेत. ही बाब लक्षात घेऊन नवीन पूल उभारला गेला नसल्याने मागील काही वर्षे हा पूल वाहतूक कोंडीचे केंद्रस्थान बनला आहे. आगामी काळात उपनगर स्थानकामुळे आणखी गर्दी वाढणार आहे हे पाहता नवीन पुलाची उभारणी रेल्वे आणि बांधकाम खात्याने करावी, अशी मागणी पुढे आली आहे.







