स्थानिकांचा जीव मुठीत घेऊन प्रवास
| रेवदंडा | विशेष प्रतिनिधी |
अलिबाग तालुक्यातील चौल-आग्राव मार्गाची दयनिय अवस्था झाली आहे. रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. पावसाळ्यामुळे हा रस्ता पूर्णपणे उद्ध्वस्त झाला असून नागरिक, विद्यार्थी, गरोदर महिला व रुग्णांना अक्षरशः जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.
मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत चौल-आग्राव रस्त्याच्या दुरुस्तीचे काम मंजूर करण्यात आले होते. परंतु, सहा महिने उलटले तरी या कामाला सुरुवात झाली नाही. उलट, याआधी कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च होऊनही दोन वर्षांत अवघे तीन किमी काम पूर्ण झाले आहे. उरलेले काम ठेकेदार-सरकारी अधिकाऱ्यांच्या आळशीपणा व भ्रष्टाचाराच्या खाईत गडप झाल्याचे स्थानिक नागरिकांमधून बोलले जात आहे. याबाबत ग्रामस्थांनी महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास अधिकाऱ्यांकडे जाब विचारला. परंतु, उत्तराऐवजी विलंबाचा बहाणा देण्यात आला. त्यामुळे नागरिक संतप्त झाले असून, त्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.
ग्रामस्थांमध्ये जोरदार चर्चा आहे की, निवडणुकीदरम्यान काही नागरिकांकडून नेत्यांनी पाच वर्षांसाठी त्यांची किंमत ठरवली. परंतु, आमच्या भविष्यासाठी राजकारण्यांनी मोजकिच किंमत लावली, असा उपरोधिक टोमणा जनतेतून उमटला आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या भ्रष्टाचारविरोधी घोषणेची महाराष्ट्र सरकारकडूनच पायमल्ली झाली आहे, असा सूर नागरिकांचा आहे. तसेच, सार्वजनिक बांधकाम विभाग भ्रष्टाचाराच्या कचाट्यात अडकलेला आहे. सरकारला जनतेच्या हालअपेष्टांची काहीही पर्वा नाही, अशी चर्चा गावागावांत रंगली आहे. त्यामुळे राज्यातील सरकार फसवे आहे, कोट्यवधी निधी गेला कुठे? अधिकारी कोणाच्या दबावाखाली आहेत? असे थेट प्रश्न ग्रामस्थांकढून उपस्थित केला जात आहे. राज्य सरकारवरचा विश्वास हरपल्याने आता ग्रामस्थांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीच या प्रश्नात हस्तक्षेप करावा, अशी जोरदार मागणी सुरू झाली आहे.






