| रसायनी | प्रतिनिधी |
रसायनी पाताळगंगा परिसरात प्रदूषणाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. औद्योगिक परिसरातील काही कंपन्यांनी मुसळधार पावसाचा फायदा उचलला आहे. काही कंपन्यांकडून रसायन पाताळगंगा नदी व नाल्यामध्ये सोडल्याने पाण्याला लाल-गुलाबी रंग आला. तसेच पाण्यावर तेळकट तवंग आल्याने नदीकाठावरील गावात राहणाऱ्या नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. मुसळधार पावसाचा गैरफायदा घेत केमिकल माफियांकडून नदीपात्रात विषारी रासायनिक सांडपाणी सोडले जात असल्याचा गंभीर आरोप स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे. मात्र, याकडे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. मुसळधार पावसात जाणीवपूर्वक रसायन नाल्यावाटे रात्रीच्या वेळी आणि पहाटेच्या सुमारास नदीपात्रात सोडल्याने नदी रंग बदलत असल्याचे दिसून येत आहे. आतातरी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि लोकप्रतिनिधी या गंभीर प्रकाराची दखल घेऊन दोषींवर कठोर कारवाई करणार का? असा संतप्त सवाल परिसरातील नागरिक उपस्थित करत आहेत. पाणी लाल झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या प्रकारामुळे नदीचे नैसर्गिक अस्तित्व धोक्यात आले असून नदी पात्रातील जलचरणांचे अस्तित्त्वही धोक्यात आले आहे.







