| पनवेल | प्रतिनिधी |
आपल्या संगीत तपस्यातून नेहमीच श्रोत्यांना सांगीतिक ऊर्जा देणारे रायगडचे सुपुत्र पंडित उमेश चौधरी यांनी छत्रपती संभाजीनगर येथील महोत्सवात सुश्राव्य सुमधूर शास्त्रीय गायनाने रसिकांना मंत्रमुग्ध केले.
दोन दशकाहून अधिक काळ आपल्या अथक साधनेने गायन कलेवर प्रभुत्व निर्माण करणारे रायगडचे भूमिपुत्र पंडित उमेश चौधरी यांचा नवरात्रोत्सवानिमित्त छत्रपती संभाजीनगर येथे मानाच्या महोत्सवात शास्त्रीय गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या महोत्सवात गायन क्षेत्रातील अनेक दिग्गज जाणकारांची उपस्थिती लाभली. या महोत्सवाचे उदघाटन परम आदरणीय स्वामी विष्णूपादानंदजी महाराज यांच्या हस्ते तर भारतातील प्रख्यात शास्त्रीय गायीका पंडीता शुभदाताई पराडकर यांच्या गायनाने या महोत्सवाची सांगता झाली.
नवकलाकारांसाठी नेहमीच प्रेरणा ठरलेले पं. उमेश चौधरी यांनी देशभरात दिडशेपार संगीत मैफिली गाजवल्या आहेत. मात्र त्यांनी कधीही कुठेही त्याचा बडेजाव केला नाही. अतिशय विनम्र, साधेसरळ आणि इतरांना मदत करण्यास तत्पर असलेल्या आणि स्वरसाधनेत रमलेल्या या कलाकाराने तळागाळात संगीत सेवा वृंध्दीगत करण्याचा प्रामाणिक प्रयत्न कायम अंगिकारला, त्यामुळे त्यांच्या गायनातून संगीत साधना प्रकर्षाने जाणवते. अखिल भारतीय गंधर्व महाविद्यालयाची मसंगीत विशारदफ पदवी, जयपूर अत्रौली घराण्याचे उस्ताद अस्लम खान यांच्याकडे तब्बल दहा वर्ष शास्त्रीय संगीताची तालीम, शास्त्रीय संगीतातील बारकावे, भजनसम्राट निवृत्तीबुवा चौधरी यांचा वारसा जपत संगीत क्षेत्राची सेवा समर्पण वृत्तीने केली आहे. त्या अनुषंगाने त्यांना या बहुमानाच्या महोत्सवात आमंत्रित करण्यात आले होते. पंडित उमेश यांनी कार्यक्रमाची सुरुवात केदार रागातील ‘बन ठणका’या बिलंबीत खयालाने तर ‘चतुर सुघर बैया’ या द्रुत बंदिशीने केली.
त्यानंतर तराणा, तारील तुज अंबीका हे नाट्यपद घेउन कार्यक्रमाच्या शेवटी महरी भजनाविण काळ घालवू नको रेफ या भजनाने केली. त्यांना तबल्यावर श्री.दत्ता गोगटे तर हार्मोनियमवर श्री.जंयत नेरळकर यांनी साथसंगत लाभली. एकूणच छत्रपती संभाजीनगर येथील रसीकांसाठी पंडित उमेश चौधरी यांचे गायन सुखद श्रवणीय ठरले. यावेळी महोत्सवाला उपस्थित असलेल्या दिग्गजांनी पंडित उमेश चौधरी यांच्या गायनाचे कौतुक करून त्यांना शाबासकीची थाप दिली. त्यामुळे रायगडच्या स्वरातून छत्रपती संभाजीनगर मंत्रमुग्ध झाल्याची पोचपावती रसिकांकडून मिळाली.