| आगरदांडा | वार्ताहर |
मुरुड-जंजिरा नगरपरिषदेचे सर्व कर्मचारी आपल्या विविध मागण्यासाठी बुधवारी नगरपरिषदेच्या कार्यालया समोर काळ्या फिती लावून निदर्शने करण्यात येणार आहेत. महाराष्ट्रातील सर्व नगरपरिषद नगरपंचायत कर्मचारी व संवर्ग कर्मचाऱ्यांच्या प्रदिर्घ काळापासून प्रलंबित असलेल्या विविध मागण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्याबरोबर बैठक झाली होती. या बैठकीमध्ये कर्मचाऱ्यांचे बहुतांश प्रश्न मार्गी लावण्यासंबंधीच्या सूचना व आदेश नगर विकास विभाग, वित्त विभाग, आयुक्त तथा संचालक नगरपालिका प्रशासन यांना दिले होते. परंतु मुख्यमंत्री महोदय यांच्याबरोबर झालेल्या चर्चेनंतर 7 महिने पूर्ण होऊनही यावर अद्यापही कोणतीही कारवाई संबधित विभागांनी केलेली नाही. संघर्ष समितीच्या माध्यमातून वारंवार याबाबत पाठपुरावा करण्यात येत होता. परंतु आश्वासनाशिवाय काहीही मिळाले नाही. या विरुद्ध आवाज उठविण्यासाठी हे आंदोलन करण्यात येणार आहे.







