भाजप, शिंदे गटासोबत आघाडी नाही; आंबेडकर यांची घोषणा

। मुंबई । प्रतिनिधी ।
आम्ही भाजपाबरोबर जाऊ शकत नाही तसंच जे कोणी भाजपासह जातील त्यांच्यासोबत न जाण्याची आमची भूमिका आहे,असे वंचित आघाडीचे नेते अ‍ॅड.प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि प्रकाश आंबेडकर यांची भेट झाली आहे. एकनाथ शिंदे यांनी बुधवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे वास्तव्य असलेल्या राजगृह निवासस्थानाला भेट दिली. यावेळी प्रकाश आंबेडकर आणि त्यांची भेट झाली. या भेटीत इंदू मिलच्या जागी उभ्या राहणार्‍या स्मारकाबद्दल चर्चा झाली असल्याची माहिती प्रकाश आंबेडकर यांनी दिली. या भेटीनंतर आंबेडकर यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

आम्ही भाजपाबरोबर जाऊ शकत नाही. आम्ही त्यांच्यासमोर काही मुद्दे उपस्थित केले आहेत. समाजरचनेसंबंधी आमचं भांडण आहे. जोपर्यंत त्यासंबंधी विचार केला जात नाही, तोपर्यंत भाजपासोबत जाण्याचा संबंध नाही. जे कोणी भाजपासह जातील त्यांच्यासोबत न जाण्याची आमची भूमिका आहे. त्यामुळे महाविकास आघाडीने काही प्रतिसाद दिला नाही तर फक्त स्वबळावर लढण्याचा पर्याय आमच्याकडे आहे, असं प्रकाश आंबेडकरांनी स्पष्ट केलं आहे. महाविकास आघाडीचं जोपर्यंत ठरत नाही तोपर्यंत महाराष्ट्रातील राजकीय चर्चेचं पुढे काय होईल, असं दिसत नाही, असं प्रकाश आंबेडकरांनी स्पष्ट केलं आहे.

Exit mobile version