चिमुकल्यांचे आरोग्य धोक्यात

नेरळ मोहाचीवाडी अंगणवाडीसमोरच कचर्‍याचे सम्राज्य

| नेरळ | वार्ताहर |

नेरळ मोहाचीवाडी येथे अंगवाडीतलगतच मोठ्या प्रमाणात कचरा साचला असून, अनेक दिवसांपासून कचरा उचलला गेला नसल्याने येथे मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे येथे लहान मुलांच्या आरोग्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. शाळेचे पहिले पाऊल दुर्गंधी परिसरात होत असल्याने पालकांनी संताप व्यक्त केला असून, लवकरात लवकर हा कचरा उचलण्यात यावा, अशी मागणी पालनकांकडून केली जात आहे.

रायगड जिल्ह्यातील सर्वाधिक मोठी ग्रामपंचायत म्हणून नेरळ ग्रामपंचायतीचा नावलौकिक आहे. परंतु, मागील वर्षापासून या ग्रामपंचायतीचा कारभार जिल्ह्यात चव्हाट्यावर आला आहे. सर्व सदस्यांच्या राजीनाम्यानाट्यानंतर येथील सरपंच, ग्रामसेवक ग्रामपंचायतीचा कारभार हाकत असताना मात्र नागरिकांच्या मूलभूत सुविधा सुटण्याचे नाव घेत नाही. त्यातच गेली कित्येक दिवस झाले मोहाचीवाडी येथील कचरा उचलला जात नसल्याची ओरड समोर आली. मोहाचीवाडी येथील कातकरी वाडी येथे चालवण्यात येणार्‍या एकात्मिक बालविकास सेवा केंद्रातील अंगणवाडी शाळेसमोर कचर्‍याचा ढीग साचला असताना, अंगणवाडी सेविका तसेच येथील ग्रामस्थांनी कचरा उचलण्यात यावा म्हणून ग्रामपंचायत प्रशासनाला निवेदन देऊन कळविले होते.

मात्र, यावर ग्रामपंचायत प्रशासन गंभीर असल्याचे दिसून येत नाही. सध्या पावसाचा जोर सुरू असल्याने या परिसरातील कचर्‍यामधून दुर्गंधी पसरली असून, परिसरातील वातावरण दूषित झाले आहे. रोगराई पसरल्याने येथे विविध आजाराला ग्रामस्थ बळी पडले असून, येथील शौचालयाचे पाणीदेखील रस्त्यावर वाहू लागल्याने परिसरात डासांचे प्रमाण वाढले आहे. येथील जागरूक नारिकांनी आवाज उठवला आहे. अंगणवाडी या शाळेत लहान मुलांची शाळा भरवली जात असल्याने येथे कचरा हा वेळच्या वेळी उचलला गेला पाहिजे, हे प्रथम ग्रामपंचायत प्रशासन आणि लोकप्रतिनिधींचे काम आहे; परंतु त्यावरदेखील प्रशासन गांभीर्याने घेत नसेल तर उद्या कदाचित येथे रोगराई पसरल्यास जबाबदार कोण म्हणून प्रश्‍न उपस्थित केला आहे.

अंगणवाडी परिसरात कचरा साचला असल्याच्या तक्रारी आल्या आहे. परंतु, अंगणवाडी परिसरात घंटागाडी फिरण्यासाठी जागा नाही. पाऊस असल्याने माती ओली झाली आहे. परंतु, लवकरात लवकर हा कचरा उचलला जाईल.

अरुण कार्ले,
ग्रामसेवक, नेरळ ग्रामपंचायत

Exit mobile version