‘फी’साठी मुलांचे शिक्षणच केले बंद; गुरुकुल शाळेचा प्रताप

आक्रमक पवित्र्यानंतर शाळेकडून पासवर्ड ओपन

। पेण । प्रतिनिधी ।

शाळेची फी न भरलेल्या विद्यार्थ्यांचे ऑनलाईन पासवर्ड बंद करून त्यांना शिक्षणापासून वंचित ठेवणार्‍या गुरुकुल शाळेला पालकांनी घेराव घालून शाळा प्रशासनाला जाब विचारला.याबाबत सविस्तर हकीकत अशी की, कोरोनामुळे मागील सुमारे दीड वर्षापासून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शिक्षण देणे शक्य होत नसल्याने शिक्षण विभागाने ऑनलाईन शिक्षण घेण्याचा मार्ग अवलंबला आहे. परंतु पेण शिक्षण महिला समितीच्या गुरुकुल शाळेतील विद्यार्थ्यांची फी बाकी असल्याने अशा विद्यार्थ्यांचे शाळेने ऑनलाईन शिक्षणाकरिता देण्यात येणारा पासवर्ड बंद केला होता.

त्यामुळेे या विद्यार्थ्यांंना त्यांच्या शिक्षणाच्या मूलभूत अधिकारापासून वंचित राहण्याची वेळ आली होती.शाळा प्रशासनाने अशाप्रकारे केवळ आर्थिक निकष लावून विद्यार्थ्यांवर अन्याय करणे चुकीचे असल्याने संतप्त झालेल्या पालकांनी गुरुकुल शाळेला घेराव घातला. अशाप्रकारे विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवल्यास त्यांच्या पुढील भवितव्यावर याचा विपरीत परिणाम होईल. तसेच विद्यार्थ्यांवर याचा मानसिक परिणाम सुद्धा होण्याची दाट शक्यता असल्याची चिंता पालकांनी यावेळी बोलून दाखविली.

पालकांनी मागील वर्षाची निम्मी फी भरून शाळा प्रशासनाने विद्यार्थ्यांचे ऑनलाईन शिक्षण सुरू ठेवावे, असे वारंवार संस्थेला कळविले असल्याचे सांगितले. अखेर शाळेने मागील वर्षाची निम्मी फी स्वीकारून पासवर्ड देण्याचे मान्य केले. तसेच फी बाबतचा अंतिम निर्णय पालक सभा आणि शाळा व्यवस्थापन समिती यांच्या संयुक्त बैठकीत ठरेल, असेही सांगितले.पालकांनी घेतलेल्या आक्रमक पवित्र्यामुळे अखेर शाळा प्रशासनाला झुकावे लागले. यामुळे आपल्याला पुन्हा ऑनलाईन शिक्षण मिळेल म्हणून विद्यार्थ्यांनी समाधान व्यक्त केले.

Exit mobile version