| अलिबाग | प्रतिनिधी |
जमिनीच्या सातबारा उतार्यावर वारस नोंद करण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच स्वीकारणार्या चौल मधील मंडळ अधिकारी आणि रेवदंडा येथील महिला तलाठी या दोघांना रंगेहाथ पकडण्यात आले. रायगडच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने बुधवारी ही कारवाई केली. विजय विश्वनाथ म्हापुसकर, (57) असे या मंडळ अधिकार्याचे नाव आहे. तसेच वसुंधरा धोंडू धुमाळ असे महिला तलाठ्याचे नाव आहे.
तक्रारदार यांना अखत्यारपत्र दिलेल्या महिलेचे आगरकोट, रेवदंडा येथे असलेल्या सर्व्हे क्रमांक 20/1, 20/2, 21/1, 21/3, 21/4, 23/5 या जमिनीच्या सातबारा उतार्यावर वारस नोंद करण्यासाठी आणि प्रकरणाची कागदपत्रे जमा करण्यासाठी तक्रारदार मंगळवारी (दि. 6) चौलचे मंडळ अधिकारी व रेवदंडा येथील तलाठी कार्यालयात गेले होते. दोन्ही लोकसेवक यांनी तक्रारदार यांच्याशी चर्चा करून प्रत्येकी 5 हजार रुपये अशी एकूण 10 हजार रुपये लाचेची मागणी केली होती. अखेर तक्रारदार याने रायगडच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. तक्रारीची दखल घेत पडताळणी करण्यात आली. त्यानंतर त्यांनी बुधवारी (दि.7) सापळा रचला. आरोपी तलाठी वसुंधरा धुमाळ यांनी तक्रारदार यांच्याकडून मागणी केलेली पाच हजार रुपये लाचेची रक्कम स्वीकारली. मंडळ अधिकारी विजय विश्वनाथ म्हापुसकर यांनी त्यांच्या लाचेची रक्कम रुपये 5 हजार नंतर आणण्याबाबत इशारा केला. तलाठी महिला वसुंधरा धुमाळ या लाचेची रक्कम रुपये 5 हजार हे घेऊन कार्यालयातून निघून जाणार असे तक्रारदार यांच्या लक्षात आल्याने त्यांनी इशारा दिल्याने तलाठी यांना लाचेची रक्कम रुपये 5 हजार याच्यासह ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच आरोपी लोकसेवक विजय विश्वनाथ म्हापुसकर, मंडळ अधिकारी चौल यांनी लाचेची मागणी केलेली असल्याने त्यांनादेखील पुढील कारवाईसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.