उष्णता वाढल्याने मुरूडचे नागरिक घामाघूम

। मुरूड-जंजिरा । वार्ताहर ।
ऐन जून महिन्यात मुरूड तालुक्यात वैशाख वणव्या प्रमाणे कडक ऊन पडले आहे. उष्णतेच्या काहिलीने नागरिक कमालीचे हैराण आणि घामाघूम झाले असून 15 जून हा दिवस उजाडल्या नंतर देखील पाऊस अचानक धुमकेतूप्रमाणे गायब झाला आहे. हवामान खात्याचे अंदाज फोल ठरले असून गेल्या 3 ते 4 दिवसात सर्वत्र मुसळधारच्या केवळ अफवाच ठरल्या असून प्रत्यक्षात पावसाचा ठणठणाट दिसून आला आहे. पेरणी केलेल्या शेतकर्‍यांच्या तोंडचे पाणीच पळाले आहे. रोजच्या नव्या अंदाजांना शेतकरी कंटाळले असून जुन्या काळातील व्यक्त करण्यात येणार्‍या अनुमानाकडे वळले आहेत. मुरूड तालुक्यात भात पेरणी झाली असून पाणी नसल्याने कडक उन्हामुळे नुकसान होऊन पुन्हा पेरणी करावी लागेल अशी शक्यता अनेक शेतकर्‍यांनी दिली.


कडक उन्हामुळे मुरूड बाजारपेठेत फारसी वर्दळ दिसत नव्हती. रोज येणार्‍या आंबा विक्रेत्या महिला सकाळी आल्या नव्हत्या. त्यामुळे बाजारात हापूस आंबे दिसत नव्हते. आदिवासी महिलांकडे देखील रायवळी आंबे आणि अल्प प्रमाणात रानमेवा विक्रीस दिसत होता. मुरूडच्या महावीर मार्केटमध्ये एक दोन ठिकाणी 400 रूपये डझनप्रमाणे हापूस आंबे उपलब्ध होते. चार दिवसांपूर्वी मुरूडमध्ये 250 रूपये ते 300 रूपये डझनप्रमाणे हापूस आंबे उपलब्ध होते. गावठी भाज्या देखील विक्रीस आलेल्या दिसत नव्हत्या. सध्या मध्येच ढगाळ वातावरण पुन्हा ऊन असे मुरुडचे वातावरण असून पर्यटकांचा देखील शुकशुकाट दिसत आहे. मुरूडचे तापमान पारा 33 ते 34 पर्यंत पोहचला असून सायंकाळ पर्यंत घराबाहेर पडणे मुश्किल झाले आहे.

Exit mobile version