। तळा । वार्ताहर ।
पावसाने यावर्षी लवकरच हजेरी लावली असून पावसाळापूर्व कामे पूर्ण करण्यासाठी तळा नगरपंचायत प्रशासनाची लगबग सुरू झाली आहे. मुसळधार कोसळत असलेल्या पावसाने बुधवारपासून विश्रांती घेतल्याने तळा नगरपंचायतीमार्फत शहरातील गटारांची स्वच्छता करण्यात येत आहे.
तळा शहर उंच ठिकाणी असल्याने पावसाळी पूर येण्याची शक्यता फार कमी असते. परंतु, बाजारपेठेतील गटारांमध्ये प्लास्टिक पिशव्या व इतर कचरा अडकून राहिल्यामुळे पावसाचे पाणी व गटाराचे सांडपाणी रस्त्यावरून वाहते. यामुळे संपूर्ण बाजारपेठेत दुर्गंधी पसरलेली असते. तसेच, पाण्याला जाण्यासाठी इतर मार्ग नसल्याने बाजारपेठेत ठिकठिकाणी हे पाणी साचून लहानलहान डबके तयार होतात आणि या साचलेल्या पाण्यातून वाहन गेल्यास बाजूने चालणार्या नागरिकांच्या अंगावर घाण पाणी उडते. तसेच, साचलेल्या पाण्यामुळे डासांची उत्पत्ती होऊन डेंग्यू, मलेरियासारख्या आजारांची साथ येण्याची शक्यताही नाकारता येत नाही. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून नगरपंचायतीच्या कर्मचार्यांकडून पावसाळ्यापूर्वी बाजारपेठेतील गटारांची स्वच्छता करण्यात येत आहे. यावेळी शहरातील विविध गटारांची नगरपंचायत कर्मचार्यांमार्फत स्वच्छता करण्यात येत आहे.