लाखो रुपयांचा केलेले खर्च पाण्यात
। अलिबाग । प्रमोद जाधव ।
पटसंख्ये अभावी जिल्ह्यातील सुमारे 300 शाळा बंद पडल्या होत्या. या शाळा धूळ खात होत्या. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदान केंद्रासाठी या शाळांचा वापर करण्यात आला. परंतु, गुरुवारपासून या बंद पडलेल्या शाळा पुन्हा दुर्लक्षित झाल्या आहेत. या शाळांचा वापर अन्य कामांसाठी सुरू ठेवल्यास त्या पडीक होणार नाही. त्यामुळे जिल्हा परिषद प्रशासनाने याकडे लक्ष देईल का, असा सवाल नागरिकांकडून व्यक्त केला जात आहे.
ग्रामीण भागातील गावे, वाड्या वस्त्यांमधील मुले शिकली पाहिजेत, यासाठी गाव तेथे शाळा सुरु करण्यात आल्या. जिल्हा परिषदेमार्फत वेगवेगळ्या योजनेतून शाळा उभारण्यात आल्या. परंतु, अनेक गावांतील शाळांमधील पटसंख्या हळूहळू कमी होऊ लागली. पटसंख्येअभावी शाळा बंद करण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. त्यानुसार गेल्या काही वर्षापासून जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या 300 शाळा पटसंख्येअभावी बंद पडल्या. या बंद शाळांकडे दुर्लक्ष झाल्याने खिडक्या, दरवाजे खराब होऊ लागले. परिसरात गवत, काट्यांचा झुडूप वाढू लागला. लाखो रुपये खर्च करून उभारलेल्या शाळा दुर्लक्षित झाल्या होत्या. परंतु विधानसभा निवडणुकाचा कार्यक्रम जाहीर झाल्यावर या शाळांकडे पुन्हा लक्ष देण्यास सुरुवात करण्यात आली. मतदान केंद्रासाठी या शाळांचा वापर करता यावा यासाठी शाळांची देखभाल दुरुस्ती करण्यात आली. रंगरंगोटीपासून विज पूरवठा करण्यात आला. जिल्ह्यात 20 नोव्हेंबर रोजी दोन हजारांहून अधिक मतदान केंद्रांमध्ये मतदान झाले. यामध्ये बंद पडलेल्या जिल्हा परिषद शाळांदेखील एक दिवसांसाठी बोलक्या झाल्या होत्या. परंतु शाळेच्या फलकांवर गणितांच्या आकड्यांऐवजी मतदानाची आकडेवारी दिसून आली. विद्यार्थ्यांऐवजी 18 व त्या पुढील मतदारांची मतदानांसाठी गर्दी दिसून आली. मात्र, बंद पडलेल्या या शाळा पुन्हा दुर्लक्षित झाल्याचे चित्र दिसून येत आहे. गेट उघडे, आवारातील वस्तू अस्ताव्यस्त पडलेल्या दिसून आल्या. निवडणुकांपूरता वापर होणार्या या शाळांचा अन्य कामांसाठी नियमीत वापर केल्यास या शाळा कायमच बोलक्या राहतील याकडे जिल्हा परिषद प्रशासनाने लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
दारु पिणार्यांचा अड्डा बनण्याची भीती
लाखो रुपये खर्च करून बांधलेल्या शाळा पटसंख्येअभावी बंद पडल्या आहेत. या शाळांचा वापर फक्त मतदान केंद्रासाठी होतो. अन्य वेळेला या शाळा दुर्लक्षित राहतात. त्यामुळे या शाळांचा वापर रात्रीच्यावेळी अवैध कामांसह जुगार व दारु पिणार्यांचा अड्डा बनण्याची भीती व्यक्त केली जात आहे.