कमी पटसंख्येच्या शाळांवर क्लस्टर शाळेचा उतारा

1334 शाळेतील विद्यार्थ्यांच्या एकत्रीकरणाचा विचार

| रायगड | प्रतिनिधी |

जिल्ह्यातील कमी पटसंख्येच्या शाळांमधील विद्यार्थ्यांचा शैक्षणिक गुणवत्ता आणि सर्वांगीण विकास यात राहणारी कमतरता हा मुद्दा शालेय शिक्षण विभागाने ऐरणीवर आणला आहे. त्या विद्यार्थ्यांसाठी क्लस्टर शाळेचा प्रयोग राबविला जाणार आहे. रायगड जिल्ह्यातील वीसपेक्षा कमी पटसंख्येच्या एक हजार 334 शाळा त्यासाठी विचारात घेण्यात येणार आहेत. पोलादपूर तालुक्यातील उमरठ परिसरातील पळसुरे येथे 11 शाळांचा क्लस्टर करण्याचा प्रस्ताव जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडे आला आहे. या प्रस्तावावर चर्चा आणि पालकांची संमती मिळविण्याचा प्रयत्न सुरू करण्यात आला आहे. हा प्रस्ताव मार्गी लागला तर जिल्ह्यातील कमी पटसंख्येच्या शाळांचा क्लस्टर करण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

रायगड जिल्ह्यात 20 विद्यार्थ्यांपेक्षा कमी पटसंख्या असलेल्या एक हजार 69 शाळा आहेत, या शाळांमध्ये 14 हजार 455 विद्यार्थी शिक्षण घेतात. यामध्ये एक ते पाच पटसंख्येच्या 265 तर सहा ते 20 पटसंख्येच्या एक हजार 69 शाळा आहेत. या शाळांमधील प्रत्येकाला शिक्षण ही सरकारची जबाबदारी असली, तरी कमी पटसंख्येमुळे विद्यार्थ्यांचा गुणवत्ता विकास आणि त्यांच्या व्यक्तिमत्वाला आकार देण्यात अडचणी येतात, अशी शिक्षण विभागाची धारणा आहे. यामुळे कमी पट संख्येच्या शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शाळा बंदच्या धोरणाचा फटका बसतो आहे.

अशी असणार क्लस्टर शाळा
अनेक शाळांमधील विद्यार्थ्यांना एकत्र आणणारी एक शाळा म्हणजे 'क्लस्टर शाळा'. कमी पटसंख्येच्या शाळा असलेल्या भागातील काही अंतरावरील एक मध्यवर्ती शाळा निवडून त्या शाळेत विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा दिल्या जाणार आहेत. त्या विद्यार्थ्यांना त्यांच्या गावापासून या शाळेत यावे लागते. क्लस्टर शाळेपर्यंत पोचविण्यात विद्यार्थ्यांना येण्यात अडचणी येऊ नयेत म्हणून त्यांचा प्रवास खर्च सरकारतर्फे करण्याच्या पर्यायाचा विचार केला जात आहे. किंवा कंपनी अथवा स्वयंसेवी संस्थांच्या सहभागाचा विचार केला जाणार आहे.

शिक्षणाबरोबरच मुलांचा सर्वांगीण विकास, समाजात मिसळण्याची वृत्ती, सामाजिक भान, खिलाडूवृत्ती आणि परस्परांना समजून घेण्याची कला देखील विद्यार्थ्यांमध्ये रुजली पाहिजे. परंतु एक दोन, किंवा पाच-दहा पटसंख्येच्या शाळांच्या माध्यमातून ही उद्दिष्टे साध्य करणे कठीण असते. अनेक खेळ आणि क्रीडा विषयक संधी त्यांना उपलब्ध होत नाहीत. म्हणून ‘क्लस्टर’ शाळांचा प्रयोग राबविण्यात येणार आहे.

पुनिता गुरव, प्राथमिक शिक्षणाधिकारी, रायगड जिल्हा परिषद
Exit mobile version