भर पावसात मुख्यमंत्री पंढरीत

आषाढी एकादशीचा अनुपम सोहळा
पंढरपूर | प्रतिनिधी |
आषाढी एकादशीचा अनुपम सोहळा मंगळवारी(20 जुलै) साजरा होत असून, त्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सपत्नीक पंढरीत आगमन झालेले आहे. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर यावर्षीही पायी दिंड्यांना सरकारने अनुमती दिली नाही.त्यामुळे सर्व संतांच्या पालख्या एसटीने पंढरपुरात आणण्यात आल्या आहेत.पालख्यांसोबत आलेल्यांनाच आता मंदिरात प्रवेश दिला जाणार आहे.अन्य कुणालाही प्रवेश दिला जाणार नसून शहरात 24 जुलैपर्यंत संचारबंदी जारी करण्यात आली आहे.सुमारे 300 हजार पोलिसांचा पहारा शहरात लागू करण्यात आला आहे.

खराब हवामानामुळे मुख्यमंत्र्यांना विमानाने पंढरपूरला जाता येणं शक्य नसल्याने ते रस्ते मार्गानेच पंढरपूरच्या दिशेने रवाना झालेत. विशेष म्हणजे मागील वर्षीप्रमाणे यंदाही मुख्यमंत्री स्वत: गाडी चालवत पंढरपूरला चाललेत. उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री म्हणून या महापुजेला उपस्थित राहण्याचं हे दुसरं वर्ष ठरणार आहे.

याचिका फेटाळली
आषाढी एकादशीनिमित्त महाराष्ट्रासह विविध राज्यांतून पंढरपुरात दिंड्या दाखल होतात. दिंड्यांमधून लाखो वारकरी पायी वारी करतात. मात्र, कोरोनाच्या पाश्‍वर्र्भूमीवर राज्य सरकारने पायी वारीला परवानगी नाकारली होती. राज्य सरकारच्या या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं. सर्वांना वारीची परवानगी देण्याची मागणी याचिकेत करण्यात आलेली होती. सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील कोरोना स्थितीत लक्षात घेऊन हस्तक्षेप करण्यास नकार देत याचिका फेटाळून लावली. राज्य सरकारच्या या निर्णयाला संत नामदेव महाराज संस्थानने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. संस्थानाच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर आज सरन्यायाधीश एन.व्ही. रमण यांच्या अध्यक्षतेखालील आणि ए.एस. बोपण्णा आणि ह्रषिकेश रॉय यांचा समावेश असलेल्या खंठपीठासमोर सुनावणी झाली. न्यायालयाने महाराष्ट्रातील करोना परिस्थिती लक्षात घेऊन सर्व दिंड्या आणि वारकर्‍यांना परवानगी देण्याची मागणी करणारी याचिका फेटाळून लावली.

Exit mobile version