आंतरराष्ट्रीय समिती करणार पाहणी; पाच समुद्रकिनाऱ्यांची निवड
| रायगड | प्रतिनिधी |
परदेशातील समुद्रकिनाऱ्यांच्या धर्तीवर महाराष्ट्रातील किनारे स्वच्छ, सुरक्षित आणि पर्यटकांसाठी अत्याधुनिक सुविधांनी युक्त करण्यासाठी राज्याच्या पर्यटन विभागाने एक नवीन प्रकल्प हाती घेतला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील ‘ब्लू फ्लॅग’ मानांकन मिळविण्यासाठी राज्यातील लाडघर, गुहागर, नागाव, श्रीवर्धन आणि डहाणू या पाच समुद्रकिनाऱ्यांची प्रायोगिक तत्त्वावर निवड करण्यात आली आहे. या मानांकनासाठी आवश्यक असलेले 33 निकष पूर्ण करण्याच्या दृष्टीने प्रशासनाकडून तयारी सुरू आहे. काही दिवसांत डेन्मार्कस्थित संबंधित आंतरराष्ट्रीय समितीचे पथक या पाचही समुद्रकिनाऱ्यांची पुन्हा पाहणी करणार आहे.
ब्लू फ्लॅग मानांकन केवळ समुद्रकिनाऱ्याच्या सौंदर्यावर किंवा पर्यटक सुविधांवर दिले जात नाही. पर्यावरणीय शिक्षण, समुद्राच्या पाण्याची गुणवत्ता, पर्यावरणीय व्यवस्थापन तसेच पर्यटकांची सुरक्षा आणि सेवा अशा चार प्रमुख क्षेत्रांतील एकूण 33 निकषांची पूर्तता करावी लागते. त्यामुळे निवडलेल्या पाचही किनाऱ्यांवर आवश्यक सुविधा उभारण्याबरोबरच पर्यावरणीय निकषांची पूर्तता करण्याचे मोठे आव्हान पर्यटन विभागासमोर आहे. कोकण किनारपट्टीवरील पाच समुद्र किनारे ह्या मानांकन साठी पात्र ठरले आहेत. देशातील तेरा किनाऱ्याची ह्या पथकाने पाहणी केली होती. राज्यातील पाच किनाऱ्यांचे या पाहणीत निवड झाली आहे.
समुद्रातील पाण्याची गुणवत्ता हा या मानांकनातील अत्यंत महत्त्वाचा निकष आहे. पाण्याचे नमुने निर्धारित पद्धतीने आणि ठरावीक वारंवारतेने तपासणे, पाण्याच्या गुणवत्तेचे विश्लेषण निर्धारित मानकांनुसार करणे आवश्यक आहे. समुद्रकिनाऱ्यावर परिणाम करणारा कोणत्याही प्रकारचा औद्योगिक सांडपाणी, मलनिस्सारण किंवा इतर सांडपाण्याचा प्रवाह नसणे हीदेखील महत्त्वाची अट आहे.
समुद्रकिनारा व्यवस्थापनात स्थानिकांचा सहभाग असावा, यासाठी समुद्रकिनारा व्यवस्थापन समिती स्थापन करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर किनारा कायम स्वच्छ ठेवणे, पुरेशा कचरापेट्या उपलब्ध करणे, ओला-सुका आणि पुनर्वापरयोग्य कचरा वेगळा करण्याची व्यवस्था करणे, तसेच पुरेशी आणि स्वच्छ स्वच्छतागृहे उपलब्ध करून देणे बंधनकारक आहे. स्वच्छतागृहांची नियमित स्वच्छता आणि सांडपाण्याची योग्य विल्हेवाट यालाही निकषांमध्ये महत्त्व देण्यात आले आहे.
समुद्रकिनाऱ्यावर नैसर्गिकरीत्या वाहून आलेले शेवाळ किंवा नैसर्गिक जैविक अवशेष सरसकट हटविण्याऐवजी पर्यावरणीय दृष्टिकोनातून त्यांचे व्यवस्थापन करणे अपेक्षित आहे. अनधिकृत तंबू, वाहनांची ये-जा आणि कचरा टाकण्यास प्रतिबंध असणे, तसेच पाळीव प्राण्यांच्या प्रवेशावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. सुरक्षेसाठी प्रथमोपचार साधने, आपत्कालीन परिस्थितीसाठी आराखडा आणि विविध पर्यटन उपक्रमांमुळे होणारे अपघात किंवा संघर्ष टाळण्यासाठी योग्य व्यवस्थापन आवश्यक आहे. पर्यटकांसाठी आचारसंहिता आणि समुद्रकिनाऱ्यावरील सुविधांचा नकाशा प्रदर्शित करणेही आवश्यक आहे. या संदर्भात पर्यटन विभागाच्या डेन्मार्कस्थित संबंधित समितीसोबत आतापर्यंत तीन बैठका झाल्या आहेत.







