नाविण्यपूर्ण योजना, विकासातून जिल्हाधिकारी रायगडचे “कल्याण” करणार

। अलिबाग । प्रतिनिधी ।

समाजातील सर्व घटकांच्या विकासासाठी शासनाकडून विविध “कल्याण”कारी योजना राबविण्यात येत आहेत. या पार्श्‍वभूमीवर सर्वांच्या सहकार्याने येणार्‍या काळात नाविन्यपूर्ण उपक्रम, योजनांच्या माध्यमातून जिल्ह्याच्या सर्वांगिण विकास साधण्यासाठी सर्व प्रकारचे प्रयत्न करण्यात येतील, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी सोमवारी येथे केले.

अलिबाग येथील पोलीस मैदान येथे भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या 75 व्या वर्धापनदिनानिमित्त जिल्हाधिकार्‍यांच्या हस्ते ध्वजारोहण उत्साहात संपन्न झाले, त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक अशोक दुधे, यांच्यासह सर्व वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी आदी मान्यवर उपस्थित होते. ध्वजारोहणानंतर पोलीस दलाच्या पथकांनी राष्ट्रध्वजास मानवंदना दिली.

ते पुढे म्हणाले की, जिल्ह्यातही हर घर तिरंगा अर्थात घरोघरी तिरंगा हा उपक्रम मोठ्या उत्साहात राबविला जात आहे. देशभक्तीपर सांस्कृतिक कार्यक्रम, स्वातंत्र्यसैनिकांचा सन्मान, ऐतिहासिक स्मारकांवर तिरंगा फडकविणे, स्वच्छ सागर..सुरक्षित सागर अभियान, हर घर जल उत्सव, स्वराज्य महोत्सव, तिरंगा यात्रा, दौड, मोटार सायकल रॅली, सायकल रॅली, स्वच्छता अभियान, आरोग्य शिबिरे असे विविध उपक्रम मोठ्या उत्साहाने साजरे करीत या माध्यमातून आपण आपला देशाभिमान वृध्दींगत करीत आहोत,असे ते म्हणाले.

जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून माझी वसुंधरा, कातकरी उत्थान योजना, गरूडझेप स्पर्धा परीक्षा अभियान, महाड येथे पर्जन्यमापक यंत्र, पूरपरिस्थिती हाताळण्यासाठी वॉकी-टॉकी व आवश्यक बचाव साहित्य, ओरिसा येथे शासकीय अधिकारी-कर्मचार्‍यांकरिता प्रशिक्षण अशा विविध योजना राबविण्यात आल्या. सन 2021-22 मध्ये अनुसूचित जाती उपयोजनेंतर्गत 25.60 कोटी रुपये निधी व आदिवासी उपयोजनेंतर्गत 32.98 कोटी रुपये इतका निधी लोकोपयोगी कामांकरिता 100 टक्के खर्च करण्यात प्रशासनाला यश आले. असा दावाही जिल्हाधिकार्‍यांनी केला.

सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजना सन 2022-23 अंतर्गत 320 कोटी रुपये अर्थसंकल्पीय तरतूद मंजूर करण्यात आली आहे. सर्व महानगरपालिका/नगरपालिका/नगर पंचायती यांच्यासाठी 20 कोटी रुपये विशेष अतिरिक्त निधीची तरतूद ठेवण्यात आली आहे. तसेच क वर्ग पर्यटन अंतर्गत रायगड किल्ला परिसर विकास पर्यटन आराखडा प्राधिकरणाच्या आकस्मिक कामांसाठी 5 कोटी रुपये निधी राखून ठेवण्यात आला आहे. रायगड जिल्हा पोलीस विभागासाठी 1 स्कॉर्पिओ, 16 बोलेरो जीप आणि 22 मोटार सायकली उपलब्ध करुन देण्यात आल्याने जिल्हा पोलीस दलाचेही बळकटीकरण होण्यास मदत होईल, असे ते म्हणाले.

राज्यात प्रथम

रायगड जिल्ह्यास सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजना सन 2021-22 अंतर्गत 275 कोटी रुपये निधी प्राप्त झाला होता. या निधीचे सुयोग्य नियोजन करून सन 2021-22 मध्ये मार्च-2022 अखेर 100 टक्के खर्च करून राज्यात रायगड जिल्हा प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला आहे.

Exit mobile version