अतिवृष्टीत 376 घरांची पडझड
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
मागील वर्षी जूलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीत जिल्ह्यातील 376 घरांची पडझड झाली होती. त्यात काही पुर्णतः तर काही अंशतः घरे कोसळली होती. या अतिवृष्टीत पोटाला चिमटा काढून निर्माण केलेला संसार मोडून पडला. परंतु, वर्ष उलटले तरी अद्याप नुकसानग्रस्तांना शासनाकडून मदतीचा हात मिळाला नाही. दरम्यान, ही भरपाई लाल फितीत अडकून असल्याची माहिती समोर आली आहे.
रायगड जिल्ह्यामध्ये जूलै 2025 मध्ये अतिवृष्टी झाली होती. त्यामुळे अनेक भागांत पुरपरिस्थिती निर्माण झाली होती. तर, सखल भागांमध्ये पाणी साचले होते. तसेच, या अतिवृष्टीमध्ये जिल्ह्यातील अनेक घरांची पडझड देखील झाली होती. त्यात काहींच्या घरांचे पत्रे उडाले, काहींच्या घरांची भिंत कोसळली, तर काहींचे पुर्णतः घर कोलमडून पडले. त्यामुळे या पावसात मोठी वित्तहानी झाली होती. यावेळी एकूण 376 घरांचे नुकसान झाले होते. त्यात 333 पक्क्या आणि 43 कच्च्या घरांचा समावेश आहे. त्यातील पक्क्या घरांमध्ये 24 घरांची 50 टक्के, 150 घरांची 25 टक्के, तर 159 घरांची 15 टक्के हानी झाली. तसेच, कच्च्या घरांमध्ये 4 घरांचे 50 टक्के, आठ घरांचे 25 टक्के आणि 31 घरांचे 15 टक्के नुकसान झाले असल्याची माहिती समोर आली आहे.
रायगड जिल्ह्यामधील श्रीवर्धन, कर्जत, पेण, पनवेल, म्हसळा या तालुक्यांतील 38 पासून 86 घरांचे तसेच खालापूर, रोहा, सुधागड, अलिबाग, मूरूड, माणगाव, तळा, महाड, पोलादपूर या तालुक्यातील 2 पासून 26 घरांचे नुकसान झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनकडून उपलब्ध झाली आहे. जिल्हा प्रशासनाने तातडीने नुकसानीचे पंचनामे करून नुकसानीचा अहवाल राज्य शासनाला पाठविला होता. तसेच, शासनाकडून 37 लाख रुपयांच्या भरपाईची मागणी देखील करण्यात आली होती. मात्र, वर्ष उलटले तरीदेखील शासनाकडून भरपाई मिळाली नसल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. त्याचा फटका नुकसान ग्रस्तांना बसला आहे. त्यामुळे भरपाई मिळावी, म्हणून तहसील कार्यालयात जाऊन चपला झिजविल्या जात आहेत. मात्र, अजूनपर्यंत नुकसानग्रस्तांची झोळी रिकामीच असल्याचे चित्र दिसून येत आहे.






