। अलिबाग । प्रतिनिधी ।
जुगारामुळे अनेक तरुणांसह कुटुंबं उद्ध्वस्त होत असतानादेखील चक्री जुगारासारखे धंदे राजरोसपणे सुरु असल्याच्या तक्रारी आहेत. जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या अलिबागसह पेणलादेखील या अवैध धंद्याने विळखा घातला आहे. मात्र, पोलिसांकडून या धंद्यावर कारवाई होत नसल्याचा आरोप केला जात आहे. काही ठिकाणी सत्ताधार्यांच्या दबामुळेदेखील पोलीस कारवाई करीत नाहीत, असेही बोलले जात आहे. त्यामुळे या बेकायदेशीर धंद्यावर पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे अंकुश ठेवतील का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
अलिबाग पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर पीएनपी नगर, मासळी बाजार, मेघा चित्र मंदिरजवळ, विद्यानगरमधील माय शॉपी परिसरात तसेच चेंढरे येथील सेंटमेरी स्कूलच्या काही अंतरावर, बाजारातील मिरची गल्ली, तसेच रेवस बायपास रोड अशा ठिकाणी चक्री जुगार चालविला जात असल्याची चर्चा आहे. पेण शहरासह रसायनी, खोपोली परिसरातदेखील हा धंदा खुलेआमपणे जुगारमाफिया चालवित आहेत, असे सांगण्यात येते. पोलीसदेखील काहीच बिघडवू शकत नाही, अशा पद्धतीने ही मंडळी आपला अवैध व्यवसाय सुरू ठेवत आहेत.
जुगारामुळे अनेक तरुण कर्जबाजारी होत असल्याच्या घटना जिल्ह्यात घडत आहेत. या कर्जातून मुक्ती मिळविण्यासाठी चोरीचे गुन्हेदेखील होत आहेत. चक्री जुगाराला बंदी असतानाही हे धंदे बिनधास्तपणे चालविले जात आहेत. कारवाई करण्यास गेलेल्या पोलिसांना सत्ताधार्यांकडून फोन आल्यावर माझा धंदा आहे, असे सांगितले जाते. त्यामुळे अनेक पोलिसांना कारवाई न करता परत माघारी फिरावे लागत आहे, अशी चर्चा पोलिसांकडून ऐकावयास मिळत आहे. काही पोलिसांनी कारवाई केल्यावर त्यांना अन्य ठिकाणी बदली करून शिक्षा देण्याचा प्रकारदेखील जिल्ह्यात घडत आहे. चक्री जुगारामुळे आर्थिक हानी मोठ्या प्रमाणात होत असून, कुटुंबं उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे याकडे पोलीस अधीक्षक घार्गे यांनी गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी केली जात आहे.
पेणमध्ये छुप्या पद्धतीने सुरु असलेल्या चक्री जुगारावर कारवाई करण्याची मोहीम हाती घेतली जाणार आहे. माहिती घेऊन त्यांच्यावर लवकरच छापे टाकले जाणार आहेत.
देवेंद्र पोळ,
पोलीस निरीक्षक,
पेण
अलिबागमध्ये अवैध धंद्यावर कारवाई केली जात आहे. मात्र, ज्या ठिकाणी चक्री जुगार सुरु आहे, त्यांच्यावरही कारवाई केली जाणार आहे.
संजय पाटील,
पोलीस निरीक्षक,
अलिबाग