बांबूचा संसाराला हातभार

गौरी-गणपतीसाठी बांबूनिर्मित वस्तूंना मागणी
आदिवासींना रोजगार मिळवून देणारा व्यवसाय

| नेरळ | संतोष पेरणे |

कर्जत तालुक्यातील सहा आदिवासीवाड्यांमध्ये राहणारे आदिवासी यांचा व्यवसाय हा त्यांना आर्थिक स्थिरता देणारा ठरत आहे. बांबूंपासून तयार करण्यात येणार्‍या विविध वस्तूंच्या विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह होत असून, संसाराला हातभार लागत आहे. गौरी-गणपती सणासाठी लागणार्‍या टोपल्या, सूप आदी वस्तूंना सध्या मोठी मागणी असून, खरेदीसाठी ग्राहकांचीही बाजारात गर्दी होत आहे.

पोशीर, कळंब आणि वारे या ग्रामपंचायतींमधील आदिवासी वाड्यांमधील लोक वर्षानुवर्षे आणि बारमाही व्यवसाय म्हणून बांबूच्या पातींपासून वस्तू निर्माण करतात. खास गौरीगणपती सणाला आवर्जून बनलेल्या वस्तूंची मागणी वाढली आहे. नेरळ येथील बाजारात बांबूच्या पातींपासून बनवलेल्या वस्तूंसाठी ठाणे जिल्ह्यातील भक्त आवर्जून भेट देत आहेत. गौरी-गणपतीच्या सणाला तर गौरी आवाहनाला नवीन टोपली आणि सूप आवश्यक असतात. त्या टोपली आणि सुपांची निर्मिती पोशीर ग्रामपंचायतीमधील गिर्‍याचीवाडी तसेच उंबरवाडी आणि चिंचवाडीमधील बहुसंख्य आदिवासी ग्रामस्थ करीत असतात. त्या तिन्ही वाड्यांतील प्रत्येक घरात बांबूच्या वस्तू बनविण्याचे काम वर्षभर सुरु असते.

तर, त्यांच्या या वस्तूंना गणेशोत्सव काळात मोठी मागणी असल्याने ही आदिवासी कुटुंब एप्रिल महिन्यापासून त्याच वस्तूंच्या निर्मितीत गुंतलेली असतात. त्यासाठी जंगली भागातील बांबू विकत आणून आपली कारागिरी सुरु करतात. या तिन्ही गावातील महिला या नेरळ तसेच बदलापूर, कल्याण आणि कर्जत येथील बाजारात टोपली आणि सुपे विकण्यासाठी घरातून बाहेर पडतात. तर, पुरुष मंडळी घरात साहित्य बनविण्यात व्यस्त असतात

आम्ही वर्षानुवर्षे नेरळ येथे स्टेशनसमोर व्यवसाय करतो. पूर्वी त्या ठिकाणी सकाळी सात वाजता जरी बांबूच्या वस्तू घेऊन आलो, तर दोन तासात त्यांची विक्री होत असायची. मात्र, आता फुलांची गौराई आणणे बंद झाल्यामुळे माती किंवा पीओपी यांच्या मूर्ती विराजमान होऊ लागल्या आहेत. त्यामुळे टोपल्या आणि सुपे यांची विक्री कमी झाली आहे. परंतु, जे निस्सीम भक्त आहेत, त्यांच्याकडून मात्र नवीन टोपली आणि सुपे यांची मागणी कायम असते.

– नामी नागो पारधी, गिर्‍याची वाडी



व्यवसायातून स्थिरता
कर्जत तालुक्यातील सहा आदिवासी वाड्यांमधील आदिवासी लोकांना बांबूच्या कारागिरीतून निर्माण होणार्‍या वस्तू यांचा आर्थिक स्थिरता निर्माण करण्यासाठी मदत होत आहे.त्या सहा वाड्यांमधील आदिवासी लोकांनाच उदरनिर्वाहाचा हा कायमचा व्यवसाय आहे.

Exit mobile version