हाणामारीप्रकरणी परस्परविरोधी गुन्हे दाखल
| पोलादपूर | प्रतिनिधी |
न्यायप्रविष्ठ जमिनीवर बोअरवेल करण्याने कापडे बुदु्रक सपकाळवाडीतील दोन गटात तीव्र संघर्ष होऊन झालेल्या हाणामारीप्रकरणी दोन्ही गटांच्या परस्परविरोधी तक्रारींमुळे दोन्ही गटांवर गुन्हे दाखल झाले आहेत. दोन्ही गटांतील चारजण जखमी झाले असून, पहिल्या गुन्ह्यात आठ, तर दुसर्या गुन्ह्यात सहा आरोपींविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कापडे बुदु्रक सपकाळवाडीतील हाणामारीप्रकरणी फिर्यादी संतोष गणपत सकपाळ (48) यांनी त्यांच्या नवीन घरासमोरील जागेमध्ये बोअरवेल पंपाचे काम सुरू केल्याने तेथे जितेंद्र रामचंद्र सकपाळ याने सदरच्या कामाला आक्षेप घेतला असता सदरचा दावा कोर्टात असल्याचे सांगून फिर्यादीने काम सुरू ठेवले. यानंतर जितेंद्र यांनी फिर्यादी याची मान पकडून हाताबुक्क्यांनी मारहाण केली आणि थोड्या वेळाने तेथून जाऊन मुलगा प्रतीक व मित्र सोहम, गणेश व इतर चार अनोळखी इसम असे एकत्रित जमून संतोष सपकाळ आणि साक्षीदार गणपत सपकाळ यांना हाताबुक्क्यांनी दुखापत करून मारहाण केली. यावेळी आरोपी सुवर्णा सपकाळ आणि मुलगा प्रतीक सपकाळ यांनीही संतोष सपकाळ याच्या वडिलांना शिविगाळ करून ठार मारण्याची धमकी दिली. अशी फिर्याद दाखल केल्याने जितेंद्र रामचंद्र सपकाळ, प्रतीक जितेंद्र सपकाळ, सोहम संदेश सपकाळ, गणेश रामचंद्र सपकाळ व 4 अनोळखी इसमांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी पोलीस निरीक्षक अनिल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार बामणे यांनी गुन्हा दाखल केला असून, पोलीस सहायक फौजदार जागडे यांनी पुढील तपास सुरू केला आहे.
दरम्यान, फिर्यादी जितेंद्र रामचंद्र सपकाळ यांनी दिलेल्या तक्रारीनुसार संतोष गणपत सपकाळ, गणपत सपकाळ, सुनीता गणपत सपकाळ, सचिन शेठ आणि त्यांचे दोन कामगार यांनी जितेंद्र सपकाळ यांच्या मालकीचे जागेत बोअरवेलचे काम सुरू केले असता जितेंद्र सकपाळ यांनी कोर्टाचा निकाल लागत नाही तोपर्यंत काम करायचे नाही, असे सांगितले. यामुळे आरोपी संतोष सपकाळ यांस राग येऊन त्याने जितेंद्र सपकाळ याची कॉलर पकडून मारहाण सुरू केली असताना सचिन शेठ आणि त्याच्या दोन कामगारांनी जितेंद्र सपकाळ यांचे दोन्ही हात धरून गणपत सपकाळ व सुनीता सपकाळ यांनी हातात काठ्या घेऊन जितेंद्र सपकाळ यांना मारहाण केली. तेथे सुवर्णा सपकाळ, प्रतीक सपकाळ व गणेश हे आले असता त्यांनादेखील सर्वांनी गैरकायद्याची मंडळी आणून काठीने आणि हाताबुक्क्याने दुखापत करून शिवीगाळी आणि दुखापत केली. याप्रकरणी पोलीस निरीक्षक अनिल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार बामणे यांनी गुन्हा दाखल केला असून, पोलीस सहायक फौजदार जागडे यांनी पुढील तपास सुरू केला आहे.
पोलादपूर तालुक्यात पाणीटंचाईचा प्रश्न वाढत असताना बोअरवेल खोदकामासाठी झालेल्या या वादामुळे या समस्येची तीव्रता स्पष्ट झाली आहे.