सात जनावरांची केली सुटका; स्थानिक संतप्त,तणावाची स्थिती
। नेरळ । प्रतिनिधी ।
कर्जत तालुक्यातील सावेळे गावामध्ये एका तरुणाला दिवसाढवळ्या गाय कापत असताना गोरक्षकांनी पाहिले. त्यानंतर 15 मिनिटात कर्जत पोलीस त्या ठिकाणी पोहचले आणि निर्माण झालेली तणावाची परिस्थिती नियंत्रणात आणली. दरम्यान, गायीची कत्तल करण्याप्रकरणी कर्जत पोलिसांनी अलकाज पटेल या तरुणाला ताब्यात घेतले असून, अन्य सात पशूंची कत्तल होण्यापासून सुटका करून त्यांना गोशालेत दाखल केले आहे.
सावेळे गावातील अलकाज पटेल हा तरुण गोधनाची कत्तल करून गोमांस विकतो, अशी चर्चा होती. गुरूवारी (दि. 24) सकाळी साडे अकरा वाजता अलकाज पटेल याच्या घराच्या बाजूने जात असताना गाय कापत असल्याचे दिसून आले. गोरक्षकाने बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांकडे ही माहिती पोहोचवली. गोरक्षकांकडून कर्जत पोलिसांना माहिती देण्यात आल्यानंतर कर्जत पोलीस सावेळे गावात पोहचले. तेथे पटेल याच्या घराच्या मागील बाजूस सात जनावरे बांधून ठेवली असल्याचे दिसून आले. पोलिसांनी गोरक्षकाकडे चौकशी केली असता गाय कापली जात असताना घडलेला सर्व प्रकार पोलीस निरीक्षक सुरेंद्र गरड यांच्या समोर कथन केला. त्यावेळी जवळपास दीडशे ते दोनशे लोकांची गर्दी घटनास्थळी झाली होती. त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी गायीची कत्तल करणारा तरुण अकलाज पटेल याला ताब्यात घेऊन कर्जत येथे पाठवून दिले.
गायीची कत्तल करणार्याला अटक केल्यामुळे तेथे जमलेला जमाव शांत झाला आणि पुढे पोलिसांनी कारवाई सुरू केली. त्यात घटनास्थळी असलेल्या मांसांची तपासणी करण्यासाठी कर्जत येथून पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. मनगोली यांना बोलावून घेण्यात आले. पशुवैद्यकीय अधिकार्यांनी ते सर्व मांस तपासणीसाठी ताब्यात घेतले आणि सात गोवंशांना जवळच्या गोशाळेत पाठवून दिले. त्या ठिकाणी सर्व जनावरांची तपासणी करण्यासाठी पशुवैद्यकीय अधिकारी हे सात जनावरे ठेवलेल्या गोशाळेत पोहचल्या. कत्तल करण्यासाठी आणलेली आणि कत्तल होण्यापासून बचावलेली सात जनावरांची आरोग्य तपासणी केली असता ती सर्व जनावरे सुदृढ असल्याचे पशुवैद्यकीय अधिकारी यांनी स्पष्ट केले. आरवंद येथील जैन गोशाळेमध्ये पोलिसांनी सावेळे येथे ताब्यात घेतलेल्या तीन गायी, दोन वासरू, एक बैल, एक खिल्लार बैल अशा सात जनावरांना सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात आले आहे. सध्या पोलिसांनी कारवाई केल्याने निर्माण झालेला तणाव निवळला आहे. याप्रकरणी कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होण्याची कार्यवाही पोलिसांकडून सुरू आहे.