रात्री वाढला उपद्रव, पोलीस गस्त अपुरी; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण, कारवाईची मागणी
| नवीन पनवेल | प्रतिनिधी |
खारघर परिसरातील विविध सेक्टरमधील खेळाची मैदाने आणि सार्वजनिक उद्याने ही नागरिकांच्या दैनंदिन आरोग्यदायी जीवनशैलीचा महत्त्वाचा भाग मानली जातात. सकाळ-सायंकाळ फिरण्यासाठी, व्यायामासाठी तसेच लहान मुलांच्या खेळासाठी ही ठिकाणे गजबजलेली असतात. मात्र, अलीकडील काही दिवसांत या मैदानांवर आणि उद्यानांमध्ये रात्री उशिरापर्यंत मद्यपींचा सुळसुळाट वाढल्याने परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
सिडकोने सेक्टरनिहाय विकसित केलेल्या या मैदानांमध्ये दिवसा क्रिकेटचे प्रशिक्षण, क्रीडा उपक्रम आणि ज्येष्ठ नागरिकांची वॉकिंग यामुळे उत्साही वातावरण असते. परंतु, रात्री तरुणांचे गट मद्यपान करत बसत असल्याचे चित्र दिसत आहे. मद्यपानानंतर काचेच्या बाटल्या व प्लॅस्टिक कचरा मैदानात टाकून दिला जात असल्याने स्वच्छतेचा प्रश्न निर्माण झाला आहे. सकाळी फिरायला येणाऱ्या नागरिकांना आणि लहान मुलांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. पोलीस गस्तीचे प्रमाण कमी असल्याने महिलांमध्ये आणि ज्येष्ठ नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढीस लागली आहे. तक्रारी करूनही ठोस कारवाई होत नसल्याची खंत नागरिकांनी व्यक्त केली आहे. सीसीटीव्ही बसविणे, नियमित गस्त वाढविणे आणि नियमभंग करणाऱ्यांवर कठोर दंडात्मक कारवाई करण्याची मागणी होत आहे.
पोलीस गस्त वाढविण्याची मागणी
सेक्टर 6 ते सेक्टर 12 दरम्यान नाल्यालगत रात्री 12 ते 2 या वेळेत मद्यपींचा उपद्रव सुरू असून, स्थानिकांनी विरोध केल्यास मारहाणीच्या धमक्या दिल्या जातात. याशिवाय परिसरात उभ्या वाहनांमधून पेट्रोल चोरीचे प्रकारही वाढले आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रशासनाने सार्वजनिक ठिकाणांची सुरक्षितता राखण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी होत आहे. रात्रीच्या वेळेस नियमित पोलीस गस्त नसल्यामुळेच मद्यपींचा उपद्रव वाढत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. सीसीटीव्ही यंत्रणा, प्रकाशयोजना आणि कडक दंडात्मक कारवाई केल्यास परिस्थिती नियंत्रणात येऊ शकते, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
रात्रीच्या वेळी पोलिसांची गस्त नियमितपणे सुरू असते. तसेच नागरिकांच्या तक्रारी असतील, तर गस्तीचे प्रमाण वाढविले जाईल.
-संजय जोशी, वरिष्ठ पोलिस निरीक्षक,
खारघर पोलीस ठाणे







