उन्हेरे गरम पाण्याच्या कुंडावर पर्यटकांची गर्दी

गरम व आरोग्यदायी पाण्यात आंघोळीची मज्जा

| पाली/बेणसे | प्रतिनिधी |

सुधागड तालुक्यातील पालीपासून तीन कि.मी. अंतरावर असलेल्या उन्हेरे गावाजवळ गरम पाण्याचे कुंड आहेत. हा जणू काही निसर्गाचा चमत्कार आहे. गुलाबी थंडीत भूगर्भातील या गरम व आरोग्यदायी पाण्यात अंघोळीची मज्जा काही औरच. त्यामुळे सध्या याठिकाणी स्थानिक व पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे. सहलीला आलेले विद्यार्थीसुद्धा येथे अंघोळीचा आनंद घेतात. त्यामुळे सध्या हे स्थळ पर्यटकांनी बहरलेले दिसत आहे.


या गंधमिश्रीत पाण्याच्या कुंडात स्नान केल्यास त्वचेचे विकार व सांधेदुखी आदी आजार बरे होतात असे म्हटले जाते. येथे महाराष्ट्रासह देशविदेशातील अनके पर्यटक येतात. सर्व ऋतूमध्ये हे स्थान उपयुक्त आहे. मात्र, थंडीच्या दिवसात पर्यटकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ दिसत आहे. या ठिकाणी जेवण, अल्पोपहार करण्यासाठी हॉटेल तसेच राहण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे गेस्ट हाऊस आणि खाजगी हॉटेल आहेत.

उन्हेरे गरम पाण्याचे कुंड
उन्हेर कुंडावर एकुण तीन कुंड आहेत. त्यातील एक कुंड थंड पाण्याचे आहे, तर उर्वरित दोन कुंड गरम पाण्याचे आहेत. यापैकी थंड पाण्याचे व त्याच्या शेजारी असलेले गरम पाण्याचे कुंड बंदिस्त नाही. तर, दुसरे कुंड बंदिस्त असून, त्यामध्ये महिला व पुरुषांसाठी दोन भाग केले आहेत.



ताजेतवाने वाटते
या गरम पाण्यात स्नान केल्यास ताजेतवाने वाटते व शरीरातील क्षीण नाहीसा होतो. त्यामुळे दिवसभर मोलमजुरी करून आलेले कामगार, शेतात काम करून दमून थकून आलेले शेतकरी व स्थानिक संध्याकाळी येथून स्नान केल्याशिवाय घरी जात नाहीत.

Exit mobile version