जंजिरा किल्ला पाहण्यासाठी तोबा गर्दी

शाळकरी मुले, पर्यटकांच्या रांगाच रांगा

| मुरुड जंजिरा | वार्ताहर |

तालुक्यातील काशीद, मुरुड, नांदगाव व ऐतिहासिक जंजिरा किल्ल्यावर पर्यटकांनी व शाळकरी मुलांनी मोठी गर्दी केली आहे. मुरुडसह श्रीवर्धन, अलिबाग, नागाव, रेवदंडा, आक्षी, किहीम आदींसह सर्वच ठिकाणे पर्यटकांनी हाऊसफुल्ल झाली आहेत. राजपुरी येथे जंजिरा किल्ल्याचे तिकीट काढण्यासाठी पर्यटकांची गर्दी झाली.

सकाळी सात वाजल्यापासून पर्यटक राजपुरी जेट्टीवर व खोरा जेट्टीवर हजर झाले; परंतु जंजिरा किल्ला पुरातत्व विभाग सकाळी 9.30 शिवाय उघडत नाही. तिकीट घेईपर्यंत 10 वाजतात. नंतर बोटीतून किल्ल्यात जाणार तोपर्यंत कडक उन्हाने पारा चढतो व लहान मुले हैराण होतात. किल्ला सकाळी आठ वाजता उघडण्याची विनंती पर्यटक करत आहे. राजपुरीच्या मुख्य जेट्टी भरतीमुळे वापरता येत नाही.

समुद्र किनारी मोठ्या संख्येने पर्यटक अवतरले असून, सुट्टीचा आनंद घेत आहेत. पर्यटकांनी शनिवारी सायंकाळपासून गर्दी करण्यास सुरुवात केली होती. हळूहळू सर्व लॉज फुल्ल झाल्या आहेत. समुद्रकिनारी असणार्‍या प्रत्येक स्टॉलवर गर्दी पहावयास मिळत आहे.

आज जंजिरा किल्ल्यावरसुद्धा मोठी गर्दी पहावयास मिळाली. औरंगाबाद, लातूर, परभणी, मुंबई, कल्याण, डोंबवली, विरार, दहिसर, ठाणे आदी भागातील पर्यटक मोठ्या संख्येने येथे हजर झाले आहेत. रस्त्याच्या दोन्ही बाजूस वाहनांची मोठी गर्दी दिसत असून, काही काळ वाहतूक कोंडीसुद्धा झाली. परंतु, ट्राफिक हवालदार आपली भूमिका चोख बजावत असल्याने वाहतुकीस रस्ता मिळत होता. हॉटेलमधील चविष्ठ मासे खाण्यासाठी पर्यटकांनी मोठी गर्दी केल्याचेसुद्धा दिसून आले. पर्यटकांची संख्या वाढल्याने प्रत्येक घटकाला स्वयंरोजगार प्राप्त झाला होता. प्रत्येक तासाला वाहनांची वाढती संख्या व वाहतुकीसाठी रस्ता मोकळा करताना मोठी समस्या उद्भवत होती.

पर्यटकांमुळे आज मुख्य बाजारपेठेतसुद्धा गर्दी दिसून आली. विविध वस्तू खरेदीसाठी पर्यटक बाजारपेठेतसुद्धा आले होते. समुद्रस्नान, बोटिंग, उंट सफारी, बनाना रायडिंग आदींचा आनंद लुटताना पर्यटक दिसत होते.

कारवाईचे आदेश
पर्यटकांनी आपली वाहने व मोटारसायकल वाळूत नेऊ नये, अशी सूचना पोलिसांकडून देण्यात येत आहे. भरतीच्या पाण्यात अपघात होण्याची शक्यता असल्याचे पोलीस पर्यटकांना समजावून सांगत आहेत. तरीदेखील वाहन वाळूत उतरवले तर त्याच्यावर कारवाई होणार आहे.

Exit mobile version