‌‘शिवतीर्थ‌’ उभारणीला दिवाळीचा मुहूर्त?

सीआरझेडची परवानगी अखेर मिळाली
77 कोटींच्या प्रशासकीय वास्तूचा मार्ग मोकळा

| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |

रायगड जिल्हा परिषदेचा सर्व प्रशासकीय कारभार एकाच छताखाली आणण्याचे स्वप्न साकार करणारे रायगडचे भाग्यविधाते माजी जिल्हा परिषद अध्यक्ष स्व. प्रभाकर पाटील यांच्या दूरदृष्टीला आता नव्याने आकार मिळण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. सीआरझेड विभागाकडून अखेर बहुप्रतीक्षित परवानगी मिळाल्याने अलिबाग येथील रायगड जिल्हा परिषदेच्या नव्या प्रशासकीय इमारतीच्या उभारणीचा मार्ग मोकळा झाला असून, पावसाळ्यानंतर दिवाळीच्या सुमारास या बहुमजली इमारतीच्या बांधकामाचा शुभारंभ होण्याची शक्यता आहे.

रायगड जिल्हा परिषदेची शिवतीर्थ ही प्रशासकीय इमारत 1978 मध्ये उभारण्यास सुरुवात झाली होती आणि 1982 मध्ये तिचे काम पूर्ण झाले. तत्कालीन जिल्हा परिषद अध्यक्ष स्व. प्रभाकर पाटील यांच्या संकल्पनेतून उभी राहिलेली ही वास्तू ग्रामीण भागातील नागरिकांना सर्व विभागांची कामे एकाच ठिकाणी उपलब्ध व्हावीत या उद्देशाने बांधण्यात आली होती. त्यापूर्वी जिल्हा परिषदेची बहुतांश कार्यालये पेण येथे कार्यरत होती. त्यानंतर सर्व कार्यालये अलिबाग येथे स्थलांतरित करण्यात आली आणि शिवतीर्थ रायगडच्या प्रशासकीय ओळखीचे केंद्र बनली.

मात्र, चार दशकांहून अधिक काळ सेवा दिलेल्या या इमारतीचे लोणेरे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठातील स्थापत्य अभियंत्यांकडून करण्यात आलेल्या स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये इमारत धोकादायक असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर प्रशासनाने इमारत तातडीने रिकामी करण्याचा निर्णय घेतला. गेल्या चार वर्षांपासून जिल्हा परिषदेची सर्व कार्यालये कुंटेबाग आणि इतर ठिकाणी स्थलांतरित करण्यात आली असून, सध्या तेथूनच जिल्हा परिषदेचा कारभार सुरू आहे.

काही महिन्यांपूर्वी जुन्या इमारतीचे पाडकाम पूर्ण करण्यात आले. मात्र, समुद्रकिनारी असलेल्या जागेचा सीआरझेड क्षेत्रात समावेश असल्याने नव्या इमारतीच्या बांधकामासाठी आवश्यक परवानगी मिळण्यास विलंब होत होता. अखेर सीआरझेड विभागाने हिरवा कंदील दिल्याने अनेक महिन्यांपासून रखडलेला प्रकल्प पुन्हा मार्गी लागला आहे.

नव्या इमारतीचे बांधकाम तळमजला अधिक सहा मजले असे होणार असून, या प्रकल्पासाठी ग्रामविकास विभागाकडून सुमारे 77 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. पावसाळा संपल्यानंतर दिवाळीच्या सुमारास प्रत्यक्ष बांधकामाला प्रारंभ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

रायगडच्या प्रशासकीय इतिहासात महत्त्वाचा टप्पा ठरणाऱ्या या प्रकल्पामुळे पुन्हा एकदा सर्व विभाग एकाच छताखाली कार्यरत होणार असून, नागरिकांना विविध कामांसाठी वेगवेगळ्या ठिकाणी हेलपाटे मारण्याची गरज उरणार नाही. त्यामुळे अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या या प्रकल्पाला अखेर गती मिळाल्याने जिल्हाभरातून समाधान व्यक्त केले जात आहे.

स्व. प्रभाकर पाटील यांची दूरदृष्टी साकार होणार
रायगड जिल्हा परिषदेचा संपूर्ण प्रशासकीय कारभार एकाच छताखाली आणण्याची संकल्पना तत्कालीन जिल्हा परिषद अध्यक्ष स्व. प्रभाकर पाटील यांनी मांडली होती. त्यांच्या पुढाकारातून 1982 मध्ये अलिबाग येथे शिवतीर्थ ही प्रशासकीय इमारत उभी राहिली. चार दशकांहून अधिक काळ जिल्ह्याच्या प्रशासनाचा केंद्रबिंदू ठरलेली ही वास्तू धोकादायक झाल्याने पाडावी लागली. आता सीआरझेडची परवानगी मिळाल्याने त्याच ठिकाणी आधुनिक, तळमजला अधिक सहा मजली नवी प्रशासकीय इमारत उभारली जाणार असून, स्व. प्रभाकर पाटील यांची दूरदृष्टी पुन्हा नव्या रूपात साकार होणार आहे.

ग्रामविकास विभागकडून निधी मंजूर झाला असून, दिवाळीनंतर कामाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. लवकरात लवकर काम पूर्ण करुन घेण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहोत.

– नेहा भोसले, सीईओ, राजिप

Exit mobile version