| चिरनेर | प्रतिनिधी |
उरण रेल्वे स्थानकावर सुमारे 20 लाख रुपये खर्च करून तयार करण्यात आलेल्या उद्यानातील झाडे तोडून त्या जागी रिक्षा स्टँडसाठी कॉक्रिटीकरण करण्यात आले आहे. स्थानकातच विपुल जागा उपलब्ध असतानाही रिक्षा स्टँडसाठी उद्यानातील हिरवळ नष्ट केल्याने रेल्वे प्रशासनाच्या विरोधात प्रवाशांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
दोन वर्षांपूर्वी उरण-नेरुळ प्रवासी रेल्वे वाहतूक सुरू करण्यात आली आहे. दरम्यानच्या काळात उरण स्थानकाच्या आवारात प्रवेशद्वाराजवळ एक उद्यान तयार करण्यात आले होते. या उद्यानात विविध प्रकारची झाडे लाऊन उद्यान विकसित करुन हिरवळ तयार करण्यात आली होती. मात्र, या ठिकाणी रिक्षा स्टँड उभारण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून उद्यानातील 20 लाख रुपये खर्च करून जोपासण्यात आलेली झाडे तोडण्यात आली असून, त्या जागी खोदकाम करून कॉक्रिटीकरण करण्यात आले आहे. स्थानकातच इतरत्र जागा उपलब्ध असताना रिक्षा स्टँडसाठी हिरवळ नष्ट करण्याचा रेल्वे प्रशासनाच्या कामामुळे अनेक प्रवाशांनी संताप व्यक्त केला आहे. याबाबत येथील काही कर्मचाऱ्यांनीही नाराजी व्यक्त केली आहे.





