। छत्रपती संभाजीनगर । प्रतिनिधी ।
छत्रपती संभाजीनगरमधील गारखेडा परिसरातील पुंडलिकनगर भागात एक दुर्घटना घडली. महारुद्र हनुमान मंदिराजवळील एका दुमजली इमारतीमध्ये घरगुती गॅस सिलिंडरचा भीषण स्फोट झाला. या दुर्घटनेत एका महिलेचा मृत्यू झाला असून आगीत संपूर्ण घर जळून खाक झाले आहे. ही घटना शनिवारी (दि. 20) पहाटेच्या सुमारास घडली.
पुंडलिकनगरमधील महारुद्र हनुमान मंदिराजवळ रस्त्यावरच दुमजली इमारत असून या इमारतीत खालच्या बाजूस दुकाने व वरती निवासी घरे आहेत. आज शनिवारी पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास एका दुकानाला आग लागली. क्षणार्धात आगीने रौद्ररूप धारण केले आणि पाठिमागे खोलीत ठेवण्यात आलेल्या चार सिलिंडरमधील एका सिलिंडरला गळती लागून स्फोट झाला. यात पाठिमागच्या खोलीत राहणाऱ्या सुनंदा राजेंद्र मोरे (45) या महिलेचा मृत्यू झाला. तर आईला वाचविण्याच्या प्रयत्नात सुनंदा मोरे यांचा मुलगा वैभव मोरे गंभीर जखमी झाला. या स्फोटाचा आवाज एवढा भयानक होता की, पुंडलिकनगर परिसर हादरून गेला. परिसरातील नागरिकांनी तात्काळ धाव घेत घरातील नऊ व्यक्तींना सुखरूप बाहेर काढून आग विझवण्याचा प्रयत्न केला. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन पथक घटनास्थळी दाखल होऊन आग विझवली. मात्र या स्फोटात घर जळून खाक झाले.







