रस्ता इंटरनेटच्या जाळ्यात

केबल खोदकामात रस्त्यासह गटारांचे नुकसान
साईडपट्टी फुटल्याने अपघाताचा धोका

| नागोठणे । वार्ताहर ।
नागोठण्यातील हायवेनाका येथील महामार्गापासून ते शांतीनगर भागातील टॉकिज लगत असलेल्या मोबाईल टॉवरपर्यंत एअरटेल कंपनीच्या इंटरनेट काम सुरु आहे. हे काम सुरु असतांनाच इंटरनेट केबल टाकण्यासाठी नागोठण्यातील अंतर्गत रस्त्याच्या साईड पट्टीचे व पेव्हर ब्लॉक रस्त्याचे खोदकाम करण्यात आल्याने त्याची दुर्दशा झाली आहे. तसेच काही ठिकाणी गटारांचेही नुकसान झाले आहे. तसेच या खोदकामामुळे माती रस्त्यावर आल्याने तेथील धुळीमुळे दुचाकीस्वार, रिक्षा, मिनीडोर व इतर छोट्या वाहन चालकांना प्रमाणात त्रास होत आहे.

मुंबई-गोवा महामार्गावरील हायवेनाका येथून ही इंटरनेट केबल टाकण्याचे काम गेले काही दिवस सुरु आहे. मात्र हे काम करीत असतांना या कामाच्या संबधित ठेकेदाराने योग्य ती काळजी न घेता मनमानी करून सुरु ठेवलेल्या कामामुळे रस्त्याची दुर्दशा झाली आहे. या इंटरनेट केबलचे काम करण्यासाठी रस्त्याच्या साईड पट्टीला करण्यात येत आहे. मात्र हा खड्डा खोदत असतांना तीन ते चार फूट खोलवर जोडण्याची गरज असतांना काही ठिकाणी एक फूटही खोदकाम करण्यात आलेले नाही. मात्र खोदलेल्या खड्ड्यात केबल टाकल्यानंतर तो खड्डा बुजवितांना तो योग्य पद्धतीने न बुजविता थातुरमातुर पद्धतीने बुजविल्याने रस्त्याच्या साईडपट्टीची वाताहत झाली आहे. त्यामुळे या साईड पट्टीमुळे वाहनचालकांना धोका निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

ग्रामपंचायतीने केवळ हे काम करण्यासाठी नियमानुसार नाहरकत दाखला दिला आहे. बाकी हे काम करतांना इंटरनेट कंपनीने ठरवून दिलेल्या तांत्रिक बाबींचे पालन करणे तसेच खोदकाम केलेली जागा पूर्ववत करणे हे त्या संबधित कंपनीचे व ठेकेदाराचे काम आहे. तसेच ज्या ठिकाणी केबल येणार आहे ती जागा खासगी वा सोसायटीची असेल तर त्यांना विश्‍वासात घेऊन काम करण्याची गरजेचे आहे. – डॉ. मिलिंद धात्रक, नागोठणे सरपंच

Exit mobile version