। खांब । वार्ताहर ।
गेल्या आठ दहा दिवसांपासून दररोज सायंकाळच्या सुमारास कोसळत असलेल्या मुसळधार स्वरूपातील परतीच्या पावसाचा भातशेतीला चांगलाच फटका बसत असल्याने भात पिके वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे.
पावसाळी हंगामातील भातशेती कापण्यासाठी तयार झाली असतानाच परतीचा पाऊस सक्रिय झाल्याने शेतकरी वर्गाच्या चिंतेत भर पडली आहे. दररोज सायंकाळच्या सुमारास कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे शेती व शेतकरीवर्गाचे आतोनात नुकसान होऊ लागले आहे. काही शेतकरी वर्गाने पावसावर हवाला ठेऊन भाता पिकांच्या कणसांची कापणीही केली आहे. अशा शेतकरी वर्गाच्या शेतातील भाताची कणसे अक्षरक्ष: पाण्यात बुडाली आहेत. पावसाळा सुरू झाल्यापासून ते आतापर्यंत प्रचंड मेहनत करून शेतकरी वर्गाने आपापली शेती चांगली सांभाळून ठेवली. आत्तापर्यंत पिकेही जोमदार आली असतानाच परतीचा पाऊस सक्रिय झाल्याने शेती क्षेत्रावर मोठे संकटच कोसळले आहे. काही ठिकाणी भाताची रोपे पाण्यात भिजली आहे तर, काही ठिकाणी उभी भातपिके आडवी झाली आहेत. त्यामुळे या पावसामुळे अनेक शेतकरी वर्गाचे फार मोठे नुकसान झाले आहे.
पुढील काही दिवसांवर येऊन ठेपलेला दिपावली सणाचा विचार केला असता आणि पावसाची परिस्थिती अशीच राहिली तर शेतकरी वर्गाची दिवाळी अंधारात जाणार असल्याची भितीही शेतकरी वर्गाकडून व्यक्त केली जाऊ लागली आहे.