। पाली । वार्ताहर ।
जांभुळपाडा प्राथमिक आरोग्य केंद्राजवळील विजेचा खांब जीर्ण झाला असून तो धोकादायक स्थितीत आहे. हा खांब बदलण्याची मागणी आरोग्य केंद्रातर्फे महावितरणला करण्यात आली आहे. या प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी यांच्या निवासस्थानाला लागूनच हा विद्युत खांब आहे. जीर्ण झालेल्या या खांबाच्या खालच्या बाजूला मोठे छिद्र पडलेले आहे. परिणामी, हा खांब केव्हाही पडून दुर्घटना घडण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे येथील वैद्यकीय अधिकारी, रुग्ण व कर्मचार्यांचा जीव धोक्यात आहे. या वेळी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. नंदकुमार मुळे यांनी जीर्ण झालेल्या धोकादायक विजेच्या खांबाबाबत महावितरण कार्यालयाला कळवण्यात आल्याचे सांगितले.